|| विकास महाडिक,
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजप प्रवेश करून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा गेली अनेक दिवस नवी मुंबईत सुरू होती. मात्र मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांनी एका दगडात पाच पक्षी मारल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात त्यांचे विरोधक गणेश नाईक, विजय नाहटा, नामदेव भगत, दशरथ भगत आणि अनिल कौशिक यांचा क्रमांक लागतो. उमेदवारी पटकाविल्याने म्हात्रे यांनी बेलापूरचा किल्ला अर्धा सर केल्यात जमा असल्याचीही चर्चा आहे.
नवी मुंबईच्या राजकारणात म्हात्रे यांना ‘कच्चा लिंबू’ समजला जातो. २०१४ निवडणुकीत शिवसेनेला प्राधान्य न देता भाजपची उमेदवारी म्हात्रे यांनी घेतली. ही त्यांची दूरदृष्टी म्हणावी लागणारी आहे. त्या वेळी नवी मुंबईत भाजप अस्तित्वहीन होते. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर आज भाजपमध्ये जाण्यास अनेक जण इच्छुक आहेत, पण त्या वेळी राजकारणाची हवा ओळखणाऱ्या म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाची कदर करून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उमेदवारी देण्यास भाग पाडले.
त्यांनी ही उमेदवारी जिंकल्याने नाईकांना बेलापूर किल्ल्यावर पाय ठेवता आला नाही तर उत्तर भागातील ऐरोली मतदारसंघाकडे कूच करावी लागली आहे. नाईक हे राज्यातील एक प्रबळ नेते मानले जातात. अशा बलाढय़ नेत्याच्या तोंडाला भाजपने पाने पुसली आहेत. त्या नाईकांना बेलापूरमधून म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे पळ काढावा लागला आहे. त्यामुळे म्हात्रे यांचे पहिले विरोधक नाईक चितपट झाले आहेत.
शिवसेनेचा विजय साजरा करण्यासाठी पुन्हा नवी मुंबईत येईन, असे आश्वासन देणाऱ्या युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ही उमेदवारी फारशी गंभीर घेतली नाही. त्यामुळे गेले काही महिने बेलापूरसाठी गळ टाकून बसलेले पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांना त्यांनी झटका दिला आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी कायम ठेवण्यात आल्याने नाहटा यांच्या परिश्रमावर पाणी फेरले आहे. शिवसेना पालिकेत विरोधी पक्ष असताना एकही विधानसभा मतदारसंघ पदरात न पडल्याने शिवसेनेत असंतोष आहे. नाहटा यांनी गेली सहा वर्षे या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी केली होती. म्हात्रे आणि नाहटा यांचे विळ्या भोपळ्याचे वैर सर्वज्ञात आहे. माथाडी संघटनेच्या कार्यक्रमाला नवी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री सानपाडय़ात आलेले असताना या दोन स्थानिक नेत्यांची गेल्या अनेक वर्षांनंतर आरोग्यविषयक चर्चा झाली. नाहटा यांनीही वयाची साठी पार केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यात पत्ता कट झाल्याने ते पुन्हा राजकीय पिछाडीवर गेलेले आहेत.
तिसरे विरोधक नगरसेवक नामदेव भगत असून तेही उमेदवारीच्या स्पर्धेत होते. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांचे नाहटा प्रेम जगजाहीर असल्याने म्हात्रे यांचे हे स्थानिक नेतेही कट्टर विरोधक मानले जातात. या सर्व पाच स्थानिक विरोधकांचा विरोध म्हात्रे यांनी अटीतटीच्या स्पर्धेत उमेदवारी मिळवून नेस्तनाबूत केला आहे.