कोपरखैरणेतील निसर्ग उद्यान विस्तीर्ण आहे. येथे विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत असतो. आणि चालायला आलेल्या आईवडिलांसोबतच्या चिमुकल्यांचाही किलबिलाटही आहे. घाम गाळून आरोग्य राखण्यासाठी तरुण आणि वृद्ध निसर्ग उद्यानात न चुकता हजेरी लावतात. सध्या पहाटे ‘जॉगिंग’ला जाणे हे येथील विशिष्ट वर्तुळात ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनले आहे. काही येथे चालण्यासाठी, संवादासाठी तर काही जण धावण्यासाठी येतात. पहाटे प्रसन्न वातावरणात प्रदूषणापासून दूर राहण्याची निवांत सोय म्हणून येथे अनेकांची पावले वळली नाही तरच नवल!

या निसर्ग उद्यानात खरंतर झाडांची सोबत आहे. निरनिराळ्या जातीचे वृक्ष. ते इथले प्रत्येकाचे सांगाती आहेत. म्हणजे अनेकांना येथे आल्याशिवाय चैन पडत नाही. मुंबईची थंडी बोचरी नसते, किंबहुना मुंबईत थंडीचा ऋतूच नसतो. असा समज आहे आणि तो काही अंशी खराही आहे. दमट हवामानात थंडी शिरणार कोठून? त्यात सिमेंटच्या जंगलाची भराभर वाढ जास्त असल्याने थंडीचा मागमूस लागणे कठीणच. तरीही अलीकडे राज्याच्या थंडीच्या ठेकेदार ठिकाणांचे तापमान घटण्याबरोबरच मुंबई आणि तिच्या परिसरात गुलाबी थंडी येते. नवी मुंबईतही या थंडीने प्रवेश केलाय. त्यामुळे सकाळी झोंबणाऱ्या गार वाऱ्यात ‘जॉगिंग ट्रॅक’वर धावणाऱ्या पावलांची गर्दी जमू लागली आहे.

कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत चालण्याचा व्यायाम ही सध्याची अनेकांच्या ‘बिझी शेडय़ुल्ड’मधला भाग झाला आहे. थंडी प्रत्येकाला हवी; पण ती अगदीच अंगावर येणारी नको ही अपेक्षा आहे. त्यामुळे हळूहळू थोडय़ाशा वाढत्या उन्हांमुळे ती पळून जात आहे. अशा आल्हाददायी वातावरणात सध्या निसर्ग उद्यानात चालण्याच्या संस्कृतीची गोडी वाढली आहे.

या उद्यानाचा इतिहास पाहिला तर साधारण १९९९ पासून नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील घनकचरा शास्त्रोक्त पद्धतीने येथे टाकला जात होता. आजघडीला या घटनेला १७ वष्रे पूर्ण होत आहेत. या कचराभूमीचे सुंदर तरुवर तयार झाले आहे. १७ हेक्टर जमिनीवर निसर्ग उद्यानाचा डौल उभा आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच व्यायामासाठी येथे लोक येतात. थोडय़ाशा अंधुक प्रकाशात कोल्ह्य़ांचे दर्शन हेही अनपेक्षित असते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी चालणाऱ्यांची पावले काही काळ थबकतात. खाडी किनाऱ्याची खारी हवा आणि चोहोबाजूंनी विविध जातींची झाडे ही चालणाऱ्यांना व्यायामासाठी प्रेरणा देतात. मन प्रसन्न होण्यासाठीचा स्रोत म्हणून याकडे अनेक जण या उद्यानाकडे आकर्षित होतात.

गुजरातमध्ये व्यवसाय करून मनुभाई निकम हे काही वर्षांपूर्वी कोपरखरणेत स्थायिक झाले. पन्नाशीनंतर ज्या व्याधी शरीराला लागण्याची भीती असते. ती येथवर घेऊन येते, असे मनुभाई नाइलाजाने कबूल करतात. व्यायामाचे महत्त्व साठीत आल्यानंतर कळणे म्हणजे फारच लाजिरवाणे. शरीराचे वजन १२८ किलोपर्यंत गेले होते. वजन आले की व्याधी आल्या. मग त्या रोखायच्या असतात. म्हणून मग रोज पहाटे उठून पाच किलोमीटर चालणे हाच उपाय आहे. असे करूनच मी वजन शंभरच्या आत आणल्याचे मनुभाई सांगतात. अनेकांचा चालण्याचा शिरस्ता दोन वर्षे, काहींचा तीन वर्षे तर काहींचा चार वर्षांपासूनचा आहे. निसर्ग उद्यान हे यासाठी सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. उद्यानात पतंग महोत्सव भरवला जातो. संक्रातीला पतंगबाजीची तयारी जोरात असते. आजच्या व्यायामाच्या संकल्पनेनुसार खुल्या व्यायामशाळा जिथेतिथे बसविण्यात आल्या आहेत; मात्र निसर्ग उद्यानात अद्याप खुली व्यायामशाळा नाही. तशी मागणी येथील धावणाऱ्या आणि चालणाऱ्यांकडून होत आहे; परंतु त्यासाठी लोकांना प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यायामानंतर विश्रांतीसाठी वा विसाव्यासाठी येथे विरंगुळा कट्टा आहे. व्यायामाने गरम झालेले शरीर टप्प्याटप्प्याने थंड करण्यासाठी अनेक जण या विरंगुळा कट्टय़ावर बसले असतात. कामावर जाण्याची फारशी घाई नाही, असे अनेक जण शारीरिक कवायतींनंतर काही काळ आराम करतात. उद्यानात हरळ (दुर्वा) वीतभर उंच उगवल्याने पावलांना थंड स्पर्श घेण्यासाठी शेकडो पावले त्यावर चालतात.

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सकाळी थोडा अधिक व्यायाम देणारा बॅडमिंटनचा खेळ रंगतो. काही क्रीडाप्रेमी या खेळात रंगलेले असतात. ही चुरस इतकी रंगते की अगदी प्रकरण २१- १९ पॉइंटस्पर्यंत येते. यात वयाची सत्तरी गाठलेले गृहस्थ आहेत. मोठय़ांसोबत लहानग्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथे घेऊन येतात. या फेऱ्या सकाळी आणि सायंकाळी असतात. काही मुलं खेळण्यात दंग असतात, पण काही आज्ञाधारी मुले आई वा वडिलांसोबत ‘जॉगिंग ट्रॅक’वर चालण्यातही रस घेतात. सकाळच्या वेळेत लहानग्यांचा किलबिलाट इथल्या वातावरणात भरून राहिलेला असतो. सोबत पक्ष्यांचा किलबिलाटही असतो. उद्यानाच्या विविध जातींच्या पक्ष्यांच्या पाटय़ा लावण्यात आल्या आहेत, पण त्यावर अधिक माहिती असायला हवी, असे येथील बच्चेकंपनीचे मत आहे.

इथे कधी काळी शास्त्रोक्त पद्धतीने कचरा टाकला जात होता आणि आजही तो टाकण्यासाठी येथे डंपर येतात. उद्यानाच्या बाजूला त्या उभ्या असतात. हीच सध्या इथल्या चालणाऱ्यांची खंत आहे. कुजलेल्या कचऱ्याच्या गाडय़ा हा सध्या इथला त्रासाचा विषय आहे.

उद्यानाबाहेर रसास्वाद

उद्यानाबाहेर कडूलिंब, आवळा, कार्ले, तुळस, आले, गव्हापासून बनवलेले रस दशरथ महागरे हे गृहस्थ बनवून देतात. दहा रुपयांना तो मिळतो. यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. पावसाळा संपल्यानंतर सर्व रसांना जास्त मागणी असते. पहाटे चार वाजता उठून महागरे हे सर्व रस बनवतात.

निसर्ग उद्यानात मोकळेपणा जाणवतो. सकाळची थंडी आणि सोबत सूर्याच्या किरणस्नानाचा बेत येथे असतो. यातून दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा मिळते.

नीतिन गवंदे, नागरिक

चालण्याचा नेम गेल्या नऊ वर्षांचा झाला आहे. मधुमेहाला चालून चालून सध्या पायदळी तुडवले आहे, एवढं मात्र नक्की.

अविनाश सरोदर

मध्यरात्री घरी आल्यानंतर शरीर थकून जाते. तरीही नवी ऊर्जा मिळविण्यासाठी निसर्ग उद्यानात बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटण्यासाठी पावले अधीर झालेली असतात.

प्रवीण म्हात्रे, हॉटेल मालक.

  • निसर्ग उद्यान, कोपरखरणे
  • उद्यानाची वेळ
  • सकाळी ते , सायंकाळी ते