उरण : १९८४ च्या प्रसिद्ध उरण शेतकरी आंदोलनाची साक्ष असलेला उरण पनवेल मार्गावरील नवघर फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच फाटकावर जमून १७ जानेवारी १९८४ ला येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी वाचवण्यासाठी तीव्र आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पागोटे गावातील तीन शेतकरी मृत्यू मुखी पडले होते. त्यामुळे नवघर फाटा हा हुतात्म्यांच्या आंदोलनाची साक्ष देणारा होता.
हा मार्ग पंचक्रोशीतील नवघर,पागोटे व कुंडेगाव तसेच भेंडखळ आदीसह उरणच्या पूर्व विभागातील गावांना जोडणारा होता. मात्र नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील रेल्वे वाहतुकीसाठी टाकण्यात आलेल्या रुळामुळे तसेच याच परिसरातील भूखंड सिडकोने नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र(सेझ)ला दिल्याने त्यांच्या ताब्यात गेला आहे. तर सिडकोने या मार्गाला पर्यायी उरण पनवेल मार्गावरील फुंडे महाविद्यालया जवळून रेल्वे उड्डाणपूल उभारला आहे. या पुलावरून सध्या संपूर्ण तालुक्याची वाहतूक होत आहे.
रेल्वे स्थानकाला हुतात्मा नाव देण्याची मागणी
माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनातील तीन हुतात्मे येथे झाले आहेत. त्याच ठिकाणी रेल्वे ने न्हावा शेवा नावाने स्थानक उभारले आहे. या स्थानकांला नवघर व हुतात्मा स्थानक असे नाव देण्याची ही मागणी करण्यात येत आहे.