नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा जून महिन्यात सुरू करू, अशी घोषणा अदानी उद्याोगसमूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी केली होती. परंतु विमानतळाचे काम पूर्ण झाले नसल्याने आता आणखी दीड महिना विलंब होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दोनपैकी एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून विमान उड्डाणाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. टर्मिनल इमारतीमध्ये बोर्डिंग पास (तिकीट) काऊंटर यंत्रणासुद्धा तयार आहे. तर सध्या विमानतळ टर्मिनल इमारतीच्या प्रथम प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे.
लंडन येथील एका नामवंत कंपनीने या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या प्रवेशद्वाराचे अनोखे संकल्प चित्र रेखाटले. मात्र या आकर्षक संकल्प चित्रात रेखाटल्याप्रमाणे प्रवेशद्वारावरील कलाकृतीमध्ये ६० ते ७० मीटर उंचीवर अॅल्युमिनियमची प्लेट जोडणी करणे हे सर्वात जोखमीचे काम आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षाचा फटका
भारत-पाकिस्तान संघर्षाचा या कामाला फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कारण केंद्राने या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मे महिन्यात विमानतळ सुरू करण्याबाबतचे पत्र अदानी कंपनीने राज्य सरकारला दिले आहे. राज्याकडूनही केंद्राला याबाबत कळवण्यात आले आहे. याबाबत सिडको मंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि अदानी समूहाच्या जनसंपर्क विभागाला संपर्क साधला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.