१,८०० कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी

सिडकोने अखत्यारीतील उलवा टेकडीची उंची कमी करणे आणि जमीन सपाटीकरण यांसारख्या कामांना सुरुवात करण्याचे ठरविले आहे. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष विमानतळ उभारणीच्या अगोदरच्या कामातील एक हजार ८०० कोटी रुपये खर्चाच्या या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे विमानतळाच्या उभारणीला येत्या महिन्याभरात आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नवी मुंबई विमानतळाला प्रथम प्राधान्य आहे. सरकारला डिसेंबर २०१९ पर्यंत या विमानतळाच्या धावपट्टीवरून पहिले टेक ऑफ करण्याचे लक्ष आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हळुवार सोडविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विक्रीकर आयुक्त संजय भाटिया यांना सिडकोची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी विमानतळ पॅकेजचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्याची बदली झाली असून त्यांच्या जागी एमआयडीसीचे भूषण गगराणी यांना विमानतळाची निविदा, प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि प्रत्यक्ष कामाला शुभांरभ करण्यासाठी सिडकोत पाठविले आहे. त्यांनीही या कामाला प्राधान्य दिले असून विमानतळ उभारणीला अडसर ठरू पाहणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे ठरविले आहे. विमानतळ उभारणीचे काम मिळणाऱ्या विकासकाला उलवा टेकडी कमी करणे, भराव टाकून सपाटीकरण करणे आणि गाढी नदीचा पात्र वळविणे यांसारखी कामे करून देणे अपरिहार्य आहे. त्यामुळे गगराणी यांनी दुसऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कामांचे निविदा प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. यात उलवा टेकडीची उंची ९२ मीटर कमी करण्याचे सहाशे कोटींचे काम आणि दोन हजार हेक्टर जमिनीचे सपाटीकरण करणे अशी दोन मुख्य कामे भागात हे काम मंजूर केले आहे. दोन सहाशे कोटी व दोन तीनशे कोटी अशी एक हजार ८०० कोटींची ही कामे सुप्रीम इन्फ्रा, बालाजी आणि जीव्हीके यांना विभागून देण्यात आलेली आहेत. जीव्हीकेने मुख्य गाभा क्षेत्र उभारण्यासाठी निविदा दाखल केली आहे.