नवी मुंबई : तळोजा फेस दोन येथे सिडको महागृहनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू असून एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत साहित्य वाहून नेणारे उद्वाहन अचानक कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एका कारचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी कंत्राटदार बी.जे. शिर्के व्यवस्थापन यांच्याविरोधात हलगर्जी व सुरक्षा साहित्य न पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश परसराम पावडे, मारुती केरबा आनेवाड, गंगाराम राजेंद्र रविदास, पंकज भीमराय अशी मयत कामगारांची नावे असून सकिरे आलम, मोहम्मद सज्जत अली अशी जखमी कामगारांची नावे आहेत. ही दुर्घटना तळोजा फेज २ येथे मंगळवारी संध्याकाळी ७च्या सुमारास घडली . सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून बांधकाम साहित्य नेणारे उद्वाहन क्रेन कोसळल्याने हा अपघात झाला. ही क्रेन खाली उभ्या असलेल्या मजुरांवर आणि कारवर कोसळली. या दुर्घटनेत उद्वाहन क्रेन ऑपरेटरसह दोन मजूर आणि कारचालक या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन कामगार गंभीर जखमी आहेत.

सिडकोच्या वतीने तळोजा फेज-२ मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम बी.जी. शिर्के कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या बांधकाम साइटवर बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी उद्वाहन क्रेन चौदाव्या मजल्यावरून क्रेन ऑपरेटरसह खाली उभ्या असलेल्या मजुरांवर तसेच कारवर कोसळली.

सिडकोतर्फे सदर दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना कंत्राटदाराकडून प्रत्येकी ७ लाख रुपये तर जखमीच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी तळोजा पोलिसांनी बी.जी. शिर्के कंपनीविरोधात हलगर्जीपणा व सुरक्षा साधने न पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नेमकी कोणाची चूक आहे याचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी दिली आहे.