उरण : पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदीची घोषणा करण्यात आली त्यानंतर पुन्हा ही बंदी हटविण्यात आली. यामुळे वर्षानुवर्षे पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तिकारावर नवे संकट आले आहे. यात शाडू मातीच्या एका गोणीमागे दहा रुपयांची वाढ झाल्याने त्याचा भारही वाढला आहे. त्यामुळे सरकारने निश्चित काय तो निर्णय घेऊन मेहनतीने शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या कित्येक पिढ्यांपासून चिरनेर या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या गावातील चिरनेर कलानगरीत गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. उरण तालुक्यात बाहेरून रंगकाम केलेल्या तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने, येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. येथील पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तिकरांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

खेड्यापाड्यात गणेशमूर्तींच्या विक्रीची दुकाने थाटली गेली असल्यामुळे, नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याची खंत येथील मूर्तिकारांनी व्यक्त केली. चिरनेर कलानगरीत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम आता फार कमी झाले असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेण येथून आणून त्यांना रंगकाम करून त्या ग्राहकांना विकल्या जातात. फार कमी कारखान्यातून शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत.

गेल्या पाच पिढ्यांपासून आमच्या कारखानात शाडू मातीच्याच मूर्ती घडविल्या जातात. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती पसंत करणारे नवे जुने ग्राहक आमच्या कारखान्यात येऊन, दोन महिने आधीच गणेशमूर्तींची नोंदणी करतात. पण बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींमुळे आमच्या मूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली असल्याची माहिती मूर्तिकार भाई चौलकर यांनी दिली.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आल्याने अनेक नव्या ग्राहकांनी आमच्याकडे शाडूच्या मूर्तीची मागणी केली होती. मात्र पुन्हा ही बंदी उठल्याने त्यांनी स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी सुरू केली आहे. त्यामुळे शाडूच्या दरात वाढ होऊनही आम्हाला अशा ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसून स्वस्तात मूर्ती देण्याची वेळ आली आहे. – मनोहर पवार, मूर्तिकार, जासई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या कित्येक पिढ्यांपासून चिरनेर गावात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. मात्र बाहेरून तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने, येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यात यंदा शाडू मातीचा दरही वाढला आहे.