श्री गणेशाचे आगमन एका आठवडय़ावर येऊन ठेपले असल्याने नवी मुंबईतील भाविक सज्ज झाले आहेत. या उत्सवासाठी आवश्यक साहित्य पुरविणाऱ्या बाजारपेठाही फुलल्या आहेत. आपल्या घरातील गणेश सर्वात वेगळा दिसावा, यासाठी नागरिकांची रघुलीला, इनऑबिट मॉल एपीएमीसी मार्केट आदी ठिकाणी मिळणाऱ्या साजावटीच्या साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. जय मल्हार मालिकेतील म्हाळसा आणि खंडोबाने वापरलेल्या दागिन्यांची डिझाईन, मुकूट, फेटा याची मागणी बाजारपेठेत अधिक दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्याने फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक आतापासून सरसावले आहेत, तर विद्युत रोषणाईच्या झगमगटासाठी चिनी माळांना जास्त मागणी असल्याचे दिसत आहे. बल्ब्सच्या, फ्लॉवर, पारलाइट, लोप लाइट, ड्रॉप लाईट, स्ट्रिप लाइट आदी प्रकारच्या माळा घरगुती डेकोरेशनसाठी उपलब्ध आहेत.
ढोल पथके सज्ज
राज्य शासनाने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली आखून दिली असूनही नवी मुंबईमध्ये ढोल पथकांचा आवाज घुमणार आहे. नियमांचे पालन करून शहरातील ढोलपथकांनी सराव सुरू आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या रोषापायी या पथकांना सराव करण्यास अडथळा आल्याने त्यांनी शहराच्या कोपऱ्यात सराव करावा लागत आहे. पोलिसांनी डीजेवर बंदी घातल्याने ढोलपथकांना मोठय़ा प्रमाणात मागणी वाढत आहे. ढोलपथकेदेखील गजाननाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत.
पर्यावरणस्नेही मूर्तीना भक्तांची पसंती
यंदा जय मल्हार, लालबागचा राजा, शिवाजी महाराज, दगडू शेठ, श्री कृष्ण तसेच विठ्ठलाच्या अवतारातील गणेश मूर्तीना मोठया प्रमाणात मागणी आहे. तसेच शाडूपासून बनवलेल्या मूर्ती तसेच कागदापासून तयार केलेल्या मूर्तीना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा इको फेंड्रली मूर्तीची मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे.
पर्यावरणस्नेही मखर
प्रदूषणाचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढत असताना नवी मुंबईत इको फेंड्रली मखरांचा प्रभाव दिसून येत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी पुठ्ठय़ापासून तयार केलेल्या मखरांना सर्वाधिक मागणी आहे. कागदाच्या लगद्याने आणि जाठ पुठ्ठय़ांनी केलेला मखर बाजारात आहे. थर्माकॉलच्या मखरांना पर्याय म्हणून ही मखर बाजारात आली होती. पण आता पर्यावरणाचे रक्षण हेच यामागे मुख्य ध्येय आहे. पुठ्ठय़ांच्या या मखरांमध्ये विविध प्रकार आहेत. या मखरांची किंमत पंधराशेपासून साडेसहा हजार रुपयांपर्यंत आहे.
गणेशभक्तांना आवाहन
गणेशमूर्तीच्या विसर्जनांनतर होणारे पाण्याचे प्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबत अनेक सामाजिक संस्था, शाळा, महविद्यालयांतील विद्यार्थी तसेच मूर्तिकार जनजागृती करत आहेत. शहरात होणाऱ्या जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इको फ्रेंडली मूर्तीचा वापर करावा असे आवाहन भाविकांना करण्यात येत आहे. विर्सजनाच्या वेळी मूर्तीच्या अंगावरील दागिने, निर्माल्य अशा सर्वच वस्तू वेगळया काढून फक्त मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहनही केले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2015 रोजी प्रकाशित
सजावटीच्या खरेदीला उधाण
इको फेंड्रली मूर्तीची मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 11-09-2015 at 01:08 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai market gears up for ganesh chaturthi festival