नवी मुंबईचे महापौरपद इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित=
नवी मुंबईचे महापौरपद इतर मागासवर्गीय खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे. नवीन महापौर विराजमान होण्यास अद्याप नऊ महिन्यांचा अवकाश असला तरी, आतापासून राजकीय वर्तुळात याबाबतची चर्चा जोरात सुरू झाली आहे. एकीकडे, ओबीसी नगरसेवकासाठी महापौरपद आरक्षित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा गणेश नाईक यांचे पुतणे व माजी महापौर सागर नाईक यांचे पुनरागमन होण्याची चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे, महापौरपदाच्या निवडणुकीचा फायदा घेत सत्तेच्या चाव्या आपल्याकडे कशा मिळवता येतील, यासाठी शिवसेनेचीही चाचपणी सुरू झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांनी कुटुंबातील कोणीही व्य़क्ती महापौरपदी व महत्त्वाच्या पदावर नसेल, असे म्हटले होते. परंतु, या विधानाला आता दोन वर्षे लोटली असून मधल्या काळात तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर नाईक यांचे पुतणे व माजी महापौर सागर नाईक यांना महापौरपदाच्या शर्यतीत उतरवण्यात येऊ शकते. सागर नाईक हे सध्या नगरसेवक नसल्यामुळे खैरणे, बोनकोडे या घरातल्या मतदारसंघातील एका नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडत तेथून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवता येईल का, याची चाचपणी सुरू झाली आहे. नाईक कुटुंबातील कुणीही याविषयी स्पष्टपणे बोलण्यास तयार नसल्याने यासंबंधीच्या चर्चेने अधिक जोर धरला आहे. दरम्यान, सागर यांच्या पुनर्वसनाचे गणित जुळले नाही तर गणेश नाईक यांचे व्याही विनोद म्हात्रे, शिरवणे येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार, तुर्भे भागातील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, पुतणीवैशाली नाईक असे आणखी काही पर्याय नाईकांपुढे असणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित झाली असली तरी आगामी महापौर निवडणुकीत येथील सत्तेचे गणित उलटे फिरविण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालकमंत्री एकनाथ िशदे आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यासाठी प्रयत्नशील असून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसोबत आतापासूनच संधान बांधले जात आहे. या पदासाठी विजय चौगुले यांचे नाव आघाडीवर असले तरी पक्षातील इतर मातबर ओबीसी नगरसेवकांशी त्यांचा असलेला विसंवाद लक्षात घेता चौगुले यांना पक्षातूनच अपशकुन होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत तीव्र स्पर्धा
राष्ट्रवादीसोबत दोन हात करत महापौर निवडणुकीत भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेत या पदासाठी तीव्र स्पर्धा असून विद्यमान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे. असे असले तरी चौगुले यांना पक्षातील मातबर मानल्या जाणाऱ्या प्रकल्पग्रस्त नेत्यांचा कडवा विरोध असून स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, एम. के. मढवी, नामदेव भगत, द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर हे ओबीसी नेते चौगुले यांच्या उमेदवारीस विरोध करण्याची शक्यता आहे.
