नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी जागावाटप अंतिम टप्प्यात

नवी मुंबई : दोन महिन्यांत नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका होतील या दृष्टीने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवर बैठकांना सुरुवात झाली आहे. करोना प्रादुर्भावापूर्वी गेल्या वर्षी याच काळात या दोन्ही पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. या वेळी प्रभाग वाटपाचा फॉम्र्युलादेखील निश्चित करण्यात आला होता.

राज्यातील निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सहा विधान परिषदेच्या निवणुका नुकत्याच पार पडल्यानंतर राज्यांतील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई, औरंगाबाद या पालिकांची निवडणुका घेण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. सरकारचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांनी नवी मुंबईत आता बैठकांचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे करोना साथीची दुसरी लाट फारशी न पसरल्यास फेब्रुवारीमध्ये पालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचना जाहीर करून आरक्षणदेखील टाकण्यात आले आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी पालिका प्रशासनाने केलेली आहे. त्यामुळे या निवडणूका दोन महिन्यांत होण्याची शक्यात गृहीत धरून शिवसेनेचे विजय नाहटा, काँग्रेसचे अनिल कौशिक, संतोष शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अध्यक्ष अशोक गावडे यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. या तीन पक्षांत जास्त बंडखोरी होऊ नये यासाठी प्रभाग वाटपांचा सामंजस्य फाम्र्युला तयार केला जात आहे. शिवसेना ६०, राष्ट्रवादी ३० आणि काँग्रेस २० प्रभाग लढविणार असल्याचे समजते, मात्र शिवसेनेने ७२ प्रभाग मागितले आहेत.  या तिन्ही पक्षांतील वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे आदेश दिले आहेत.

मनसेची भाजपकडे २२ प्रभागांची मागणी

या महाविकास आघाडीच्या समोर भाजप-मनसे युती होण्याची शक्यता असून भाजपच्या स्थानिक व मनसेच्या नेत्यांची एक बैठक बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये झाल्याचे समजते. मनसेने या ठिकाणी २२ प्रभागांची मागणी केली आहे.