२० एमएलडी पाणी देण्यास नवी मुंबई पालिकेचा हिरवा कंदील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलसाठय़ाने तळ गाठल्यामुळे दिवसाआड येणारे गढूळ पाणी; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलसाठय़ात वाढलेल्या जलपर्णीमुळे कमी झालेला पाणीपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या पनवेलकरांना सोमवारी शेजारच्या नवी मुंबई महापालिकेने मदतीचा हात दिला. पनवेलकरांना २० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) वाढीव पाणी देण्याची तयारी नवी मुंबई महापालिकेने दर्शवली आहे. त्यामुळे पनवेलमधील पाणीप्रश्नाची तीव्रता काही अंशी कमी होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि रामास्वामी एन. यांनी पनवेलकरांच्या आरोग्यरक्षणासाठी हा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या निर्णयामुळे पनवेल शहरातील दिवसाआडचे पाणी संकट तात्पुरत्या स्वरूपात का होईना मिटणार असून कळंबोली, नवीन पनवेलमधील सुमारे एक लाख कुटुंबांचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.

पनवेल महानगरपालिकेला सुमारे २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. घराबाहेर पाऊस पडू लागला तरी जानेवारीपासून एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. देहरंग धरणाने तळ गाठल्यामुळे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. एमजेपीच्या पाणीपुरवठय़ात वारंवार व्यत्यय येतो. त्यामुळे पनवेल शहरासह कळंबोली येथील रोडपाली सेक्टर १७ ते २० या परिसरात पाण्याचा दाब कमी असतो. जूनमध्ये टँकरवर अवलंबून रहावे लागते. आंतरराष्ट्रीय विमनतळ आणि स्मार्ट सिटीची स्वप्ने रंगवणाऱ्या पनवेलकरांना पाण्यासारख्या मूलभूत सोयीसाठी रोज झगडावे लागत आहे.

पालिकेचे माजी आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि विद्यमान आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेलला टंचाईच्या काळापुरती तरी मोरबे धरणातून पाणीवाढ मिळावी, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे केली होती. पनवेलकर सध्या गढुळ पाणी पीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर थेट पाणी वाढीऐवजी एमजेपीच्या दुरुस्ती व शुद्धीकरण केंद्र बंद असण्याच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी वाढ द्यावी अशी मागणी सुधाकर शिंदे यांनी नवी मुंबईच्या आयुक्तांकडे केली होती, त्यामुळे सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एमजेपीला पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थेट पुरवठा नाही

थेट मोरबे धरणातून पनवेल पालिकेला पाणी वाढ देण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे ही वाढ पनवेलकरांना थेट मिळणार नाही. मोरबे धरणातून नवी मुंबईला मिळणारे पाणी व पनवेलकरांना एमजेपीकडून मिळणाऱ्या पाण्याचा साठा वेगवेगळा आहे; मात्र जलशुद्धीकरण केंद्र एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे एमजेपीला हा वाढीव जलसाठा मिळाल्यानंतर एमजेपीच्या शटडाऊनच्या काळात पनवेलकरांना या वाढीव पाण्यातून पुरवठा करण्यात येईल.

पनवेल पालिका क्षेत्रात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. शुद्धीकरण आणि दुरुस्तीच्या काळात गैरसोय होते. त्यामुळे नवी मुंबई पालिकेचे आयुक्त रामास्वामी एन आणि नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्याकडे वाढीव पाणी मिळावे यासाठी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन सामान्यांच्या हितासाठी तात्पुरत्या स्वरूपात ही पाणी वाढ २० एमएलडीपर्यंत देण्याचा निर्णय झाला आहे. सोमवारपासून काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला. नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्यामुळे पनवेलकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.   डॉ. सुधाकर शिंदे, पनवेल पालिका आयुक्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation water scarcity marathi articles
First published on: 27-06-2017 at 01:40 IST