लोकसत्ता टीम
नवी मुंबई: नवी मुंबई शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र कबुतरांची विष्टा, पिसे या पासून बाहेर पडणाऱ्या जंतू पासून फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर कबुतरांना खाद्य टाकू नये असे आवाहन महापालिका पशू वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहरात पक्षी प्रेमी सार्वजनिक ठिकाणी कबुतरांसाठी दाणे,खाद्य टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे असे दाणे फेकत असल्यामुळे ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कबुतरांची झुंबड उडते. परिणामी या कबुतरांची विष्टा पसरलेली असते. कबुतरांच्या पिसांसह त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुंमूळे “हायपर सेंसिंटीव न्युमेनिया” चा आजार बळावण्याचे प्रमाण वाढत आहे.
आणखी वाचा- २ दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात ४ अपहरण एका मुलीचाही समावेश, कोपरखैरणेतील घटना
याबाबत उच्च न्यायलयाने देखील कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य न टाकण्या हे आदेश दिलेले आहेत. कबुतरांच्या पिसे,विष्ठेतून परिसरातील रहिवाशांना उपद्रव होत असून सार्वजनिक आरोग्यास अपायकारक परिस्थिती निर्माण करणारी असल्याने कबुतरांना उघडयावर खादय पदार्थ टाकू नये, असे आवाहन महापालिका पशू वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.