विकास महाडिक

राज्यातील पहिली महापालिका ठरणार; उपाययोजना करण्याचे घनकचरा व्यवस्थापनाला आदेश; प्रथम कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

शहरातील ओला आणि सुका घनकचऱ्याचे ८५ टक्के वर्गीकरण करण्यात यशस्वी ठरलेली नवी मुंबई पालिकेने आता इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल घनकचरा अर्थात ई कचऱ्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे ई कचरा उचलणारी नवी मुंबई पालिका राज्यात पहिली ठरणार आहे.

गुरुवारी या कचऱ्याची कार्यशाळा प्रथम पालिका कर्मचाऱ्यांसाठी घेतली जाणार असून त्यानंतर रहिवाशांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे. शहरातील औद्योगिक पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात ई कचरा तयार होत असून तो थेट संकलित केला जात आहे, पण रहिवाशी क्षेत्रात हा कचरा जमा करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज ६०० मेट्रिक टन घनकचरा जमा होत आहे. त्याची वाहतूक करून तुर्भे येथील क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. तुर्भे येथील पालिकेचा घनकचरा विल्हेवाट प्रकल्प हा देशात गौरविला गेला आहे. त्या ठिकाणी आता खतनिर्मिती प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. ओला आणि सुका घनकचरा वर्गीकरण करण्यात पालिकेला १०० टक्के यश आलेले नाही तरी इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई पालिका क्षेत्रात दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. ४० सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरात खतनिर्मिती प्रकल्प उभे केले आहेत. शहरी भाग घनकचऱ्याबाबत जागृत होत असताना ग्रामीण व झोपडपट्टी भागात मात्र उदासीनता आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे धडे अशा प्रकारे सर्व स्तरावर देण्याचा पालिका प्रयत्न करीत असताना आता ई वेस्ट जमा करण्यावर भर दिला जाणार आहे.

घरातील निकामी इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जपून ठेवण्याचा मोह रहिवाशांना आवरता येत नाही. यात नादुरुस्त संगणक, मोबाइल, त्याच्या वाहिन्या यांचाही समावेश वाढत चाललेला आहे. त्यामुळे ई कचरा ही शहराची भविष्यातील डोकेदुखी ठरणार आहे. जगातील अनेक प्रगत देशात मोठी समस्या निर्माण झाली आहे. किमान नवी मुंबईतील रहिवाशांनी ई कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी यासाठी पालिका जनजागृती करणार आहे.

केंद्र सरकारने मार्च २००६ मध्ये यासंर्दभात एक परिपत्रक काढून ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक केले आहे. ई कचऱ्यामध्ये वरकरणी न दिसणारे अनेक रासायनांचा समावेश आहे. वैद्यकीय कचऱ्याची ज्याप्रमाणे शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने बंधनकारक केले आहे. अनेक पालिका, नगरपालिका अद्याप दैनंदिन घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चाचपडत असल्याने ई कचऱ्याबाबत कोणीही गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंर्तगत ई कचऱ्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापनाला दिलेले आहेत. त्यामुळे गुरुवारी या संर्दभात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रहिवाशांना मध्ये ई कचऱ्यासंर्दभात जनजागृती करण्याअगोदर ती पालिका कर्मचाऱ्यामध्ये केली जाणार आहे. घनकचऱ्यासंर्दभात एक पाऊल पुढे टाकणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पाहिली पालिका आहे.

भंगार माफियांचा डोळा

ई कचरा जसा घातक आहे तसाच तो मौल्यवान देखील आहे. काही इलेक्टॉनिक्स वस्तूमध्ये चांदीचा वापर केला जात असल्याने या ई वेस्टवर भंगार माफियांचा डोळा असतो. काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मध्ये सोनं देखील वापरले जात असल्याचे समजते.

ई वेस्ट ही भविष्यात मोठी समस्या आहे. ती सोडविण्याच्या दृष्टीने आजच एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने हा प्रयत्न सुरू केला असून त्यात हळूहळू यश येईल, अशी अपेक्षा आहे. रहिवाशांनी स्वत:हून पुढे यावे.

-तुषार पवार, उपायुक्त, (घनकचरा व्यवस्थापन) नवी मुंबई पालिका

अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क करा

ई कचरा घरातील कचरा पेटीत टाकण्याबाबत रहिवाशी नाखूश असतात. दुरुस्त करून हा ई कचरा पुन्हा वापरता येईल याकडे जास्त कल असतो. त्यामुळे हा कचऱ्याला घरातील एक कोपरा नक्कीच व्यापून टाकत असल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर करणार आहे. त्यावर रहिवाशांनी संर्पक साधल्यानंतर घरातील ई कचरा जमा करून पालिका नेणार आहे.

खासगी कंपनीचा पुढाकार

या ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापे एमआयडीसीतील एक खासगी कंपनी पुढे सरसावली आहे. केंद्र व राज्य सरकारने या कंपनीला तशी अनुमती दिली आहे. शहरात जमा होणारा ई कचरा ही कंपनी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणार आहे.