वाशी सेक्टर ९ व १० मधील मुख्य रस्ता शेकडो फेरीवाल्यांनी बळकवला होता. या फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. यावेळी सर्व फेरीवाल्यांना तेथून हटविण्यात आले. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना या रस्त्याने मुक्त वावर मिळणार आहे. या फेरीवाल्याचे वाशी बस स्थानकाशेजारील मोकळया जागेत बसविले जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन व हक्क संघर्ष समितीने पालिका करीत असलेल्या कारवाईविरोधात मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केला आहे. या समितीच्या संयोजन बालकुंद्री यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनमानी पध्दतीने कारवाई करत असल्याचा आरोप करताना आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पावणे, सीबीडी येथील शेकडो नागरिक या मोच्र्यात सहभागी झाले होते.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मनमानी सुरु असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. पालिकेने नोटीस अत्यंत कमी वेळेत दिली. त्यानंतर व्यवसाय पर्यायी जागेत हलविण्यासाठी विक्रेत्यांना थोडाही अवधी दिला नाही. त्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. गरीब लोकांचे व्यवसाय येथे होते. पालिकेने त्यांचा विचार न करता ही कारवाई केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे.
(( फेरीवाल्यांनी व्यापलेला रस्ता पालिकेच्या जोरदार कारवाईनंतर मोकळा झाला. ))