नवी मुंबई : शुक्रवारी (१२ सप्टेंबर) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची एक बातमी सकाळपासून चर्चेचा विषय बनली आहे. समाज माध्यमात साम टीव्हीवरील एक जुनी बातमी पुन्हा फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत स्पष्टीकरण देत “अशी कोणतीही शटडाऊन कारवाई आज घेतलेली नाही. सर्व विभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.” असे सांगितले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली ही बातमी जुनी आहे. आजच्या दिवशी पाणीपुरवठा बंद करण्याचा कुठलाही कार्यक्रम नाही. नागरिकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करून निश्चिंत राहावे.” असे आवाहन केले आहे.
महापालिका प्रशासनाने हेही स्पष्ट केले की, पाणीपुरवठ्याचा शटडाऊन आवश्यक असल्यास त्याबाबतची अधिकृत माहिती नेहमीच आधीपासून देण्यात येते. यासाठी महापालिकेच्या वतीने वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी केली जाते. त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप चॅनलवरही सूचना प्रसारित केल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी या अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून समाज माध्यमावरून जुन्या बातम्या पुन्हा पुढे करून नागरिकांमध्ये गोंधळ उडवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसतो. त्यातून चुकीच्या अफवा, अनावश्यक भीती आणि प्रशासनावरील अविश्वास निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घेणे अत्यावश्यक असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त शहर अभियंत्यांनी अधोरेखित केले आहे.