नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरात पुन्हा एकदा धुरक्याचे सावट पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून रात्री आणि पहाटेच्या वेळी परिसरात धुरक्याची चादर पसरल्याने अनेकांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि श्वसनास त्रास होत आहे. यात विशेषतः लहान मुले व वृद्ध त्रस्त झाले आहेत.
वाशीतील सेक्टर २६ हे या धुरक्यांचे केंद्र स्थान बनले असून या व्यतिरिक्त सेक्टर २८, २९ तसेच तुर्भे व कोपरखैरणे भागातून याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. “खिडक्या बंद करूनही उग्र दर्प घरात शिरतो,” असे नागरिक सांगत आहेत. बुधवारी सकाळी ६ वाजता परिसरात धुरक्याचे आच्छादन दाटले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी ६ वाजता वाशी-कोपरी केंद्रावर हवेचा गुणवत्ता निर्देशांक ८० इतका नोंदवला गेला. ही पातळी ‘मध्यम’ श्रेणीत मोडते. मात्र, हवेत पीएम २.५ म्हणजे सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण २४.७ तर पीएम १० म्हणजे मोठ्या धूलीकणांचे प्रमाण ३९.१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके होते. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते थेट श्वसनमार्ग व फुफ्फुसांपर्यंत पोहोचून आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नजीकच्या पावणे औद्योगिक वसाहतीतील झिंक कास्टिंग कंपन्यांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात धूर सोडला जात असून, त्यातून निर्माण होणारे जड धूलिकण हवेत मिसळून परिसरात धुरके पसरतात. तसेच, औद्योगिक विकास महामंडळाकडूनही यावर कोणतेच नियंत्रण नसल्याने हा त्रास थेट नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या नव्याने उद्भवलेली नाही. सेक्टर २६ परिसरात अनेक वर्षांपासून धुरक्यांचा त्रास सुरू असून, यावर कठोर कारवाईची गरज आहे. औद्योगिक परिसरात गस्त वाढवणे, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे आणि परिसरात हरित पट्टा निर्माण करणे या उपाययोजना तातडीने व्हाव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसामुळे हवेत आर्द्रता वाढली असून त्यातून धुकं तयार होत आहे. मात्र वाशीतील सेक्टर २६ जवळील एपीएमसी परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या धूलिकणांमुळे रात्रीच्या वेळी धुरक्यांची समस्या अधिक वाढत आहे. याबाबत चौकशी करून आवश्यक ती पावले उचलली जातील. तसेच महापालिकेला फॉगर यंत्रणा सुरू करण्यासाठी सूचना दिल्या जातील. – सतीश पडवळ, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे