नवी मुंबई: सानपाडा सेक्टर ४ मध्ये नवी मुंबई महापालिकेने सुमारे ९१ लाख रुपये खर्चून उभारलेले बाजार संकुल पूर्णत्वास गेले असले तरी, ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी फेरीवाल्यांना रस्त्यांवरच व्यवसाय करावा लागत असून, सततच्या पावसामुळे त्यांच्या मालाचे नुकसान होत आहे. नागरिकांनाही भाजीपाला व मासळी खरेदीसाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, या बाजार संकुलात १०५ भाजीपाला व १९ मासे विक्रेत्यांसाठी स्टॉल्स, तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. संरक्षित छप्पर, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा असूनही अद्याप स्टॉल वाटप व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे संकुलाचा प्रत्यक्ष वापर सुरू होऊ शकलेला नाही.

या स्टॉलसाठी महापालिकेने ऑनलाइन निविदा प्रक्रिया जाहीर केली होती. मात्र, तांत्रिक कारणे व पात्रता अटींमुळे ही प्रक्रिया रखडली. स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाची ढिसाळ कारभारावर टीका केली असून, संकुल तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, फेरीवाले संघटनांच्या माहितीनुसार, संकुलातील जागा केवळ पालिकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत परवानेधारक फेरीवाल्यांनाच मिळावी, यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. १० जुलै रोजी न्यायालयाने ८१ परवानाधारक फेरीवाल्यांना जागा देण्याचा निर्णय दिला असून, त्यानुसार संकुलात गाळेधारकांकडून त्यांचे स्टॉल्स उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली आहे. याला विभाग अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला असून, लवकरच बाजार संकुल सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

“गाळे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच बाजार संकुल सुरू केले जाईल. सध्या सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर व्यवसाय करणाऱ्या ५८ फेरीवाल्यांना संकुलात जागा देण्यात आली आहे. उर्वरित फेरीवाल्यांसाठी नवे धोरण तयार करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू आहे.” – सागर मोरे, विभाग अधिकारी, तुर्भे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज हजारो नागरिक सानपाडा परिसरात खरेदीसाठी येतात. मात्र, रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत बाजारामुळे वाहतूक कोंडी, घाण व सार्वजनिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे संकुल तात्काळ सुरू करून फेरीवाल्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.