नवी मुंबई : नौदल अधिकारी नोकरीनिमित्त देशाबाहेर असताना त्यांच्या पत्नीने त्यांच्या नावे असलेल्या जमिनीवर परस्पर कर्ज घेतले. हे कर्ज घेताना बँक अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीला हाताशी धरले. याबाबत माहिती पतीला मिळताच नौदल अधिकाऱ्याने पत्नी आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेहा हुडा, अमृता बोडखे अशी आरोपींची नावे आहेत. अन्य एकाचे नाव अद्याप उघड झालेले नाही. अमृता बोडखे या एसबीआय बँकेत कर्ज अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नेहा या फिर्यादी विश्वास दलाल यांच्या पत्नी आहेत. विश्वास दलाल हे नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहेत. विश्वास हे नोकरी निमित्त रशिया येथे गेले असता या तिन्ही आरोपींनी मिळून फिर्यादीच्या अपरोक्ष त्यांच्या पुणेनजीक हिंजेवाडी येथील जमिनीवर ४० लाखांचे संयुक्त गृहकर्ज घेतले व ते विकासकाला दिले. हे करत असताना फिर्यादीच्या परस्पर बँकेतून बनावट व्यक्तीच्या हाताचे ठसे घेत नोटीस ऑफ इन्टिमेशन पाठवली. मात्र ही माहिती फिर्यादी विश्वास यांना मिळू नये म्हणून आरोपीने स्वत: मोबाइल क्रमांक आणि बनावट ई-मेल बनवून तो कर्ज अर्जात नमूद केला. त्यामुळे कर्जाबाबत माहिती फिर्यादी यांना न जाता फिर्यादी यांची पत्नी आणि बनावट इ मेलवर माहिती गेली. त्याला आरोपींनीच मंजुरी दिली व कर्ज मिळताच ते विकासकाच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

हेही वाचा – सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज

हेही वाचा – परतीच्या पावसामुळे उरणमधील शेतीचे नुकसान, कृषी विभागाने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिर्यादी हे जेव्हा भारतात आले त्यावेळी त्यांना हा सर्व प्रकार कळला. त्यांनी ताबडतोब याबाबत सीबीडी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. त्याची शहानिशा करीत आरोपींच्या विरोधात फसवणूक अफरातफर आदी कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.