एटीएम, बँकांबाहेरील मोठय़ा रांगा हटेनात

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला २० दिवस उलटूनही नागरिकांचा चलनसंघर्ष अद्याप संपलेला नाही. आजही तासन्तास एटीएम, बँकांबाहेर मोठय़ा रांग पाहावयास मिळत आहेत.

जुन्या नोटा बदलण्याची मर्यादा दोन हजार असल्यामुळे अनेक जण एटीएममधून पैसे काढणे पसंत करीत आहेत; मात्र एटीएममध्येही मोठय़ा रांगा लावाव्या लागत आहेत. बहुतांश एटीएममध्ये नवीन चलनाचा खडखडाट आहे. ५०० रुपये नव्या नोटा एटीएमपर्यंत पोहोचल्या नसून त्याची झळ एटीएम कार्डधारकांना बसत आहे.

कोपरखैरणे येथील प्रमुख बँकांची एटीएम चालू आहेत. कोपरखैरणे येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखा आहेत. या दोन्ही शाखांतील एटीएमध्ये फक्त २ हजार रुपयाची नोट उपलब्ध आहे. ५०० ची नवीन नोट उपलब्ध नाही. त्याव्यतिरिक बँकांमधील १००, ५० च्या नोटांचाही तुटवडा भासत आहे. काही एटीएम सेंटर सुरू होताच काही वेळातच रक्कम संपल्याने बंद करावी लागत आहेत. आजही एटीएम सेंटर बाहेरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे.

बहुतांशी एटीएममधून दोन हजाराची नोट मिळत असल्याने अनेक जण कमी रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत होते. याकरिता शंभराच्या नोटा असलेल्या एटीएमचा शोध घेतला जात होता. एटीएम सेंटरवर आला की बहुतांशी सर्वाकडून ‘शंभराच्या नोटा निघतात का,’ हाच प्रश्न सुरक्षारक्षक वा रांगेत उभ्या असलेल्या अन्य लोकांना केला जात होता.

यानंतरच रांगेत थांबायचे की नाही हे ठरवले जात होते. यामुळे शंभराच्या नोटा असतील त्या एटीएम सेंटरवरील रांगा लांबपर्यंत जात होत्या.

दोन हजार रुपयांच्या सुटय़ाची समस्या अद्याप कायमच आहे. बँकांतून अद्याप नव्या ५०० रुपयांच्या नोटा वापरासाठी आल्या नसल्याने सुटय़ा पैशांची अडचण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.