जेएनपीटीकडून ठोस आश्वासन

उरणमधील वाहतूक कोंडी व जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी करळ येथील दि. बा. पाटील चौकात सुरू झालेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन जेएनपीटीच्या अध्यक्षांनी दिल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेने दिली. मात्र ही आश्वासने फोल ठरल्यास २७ डिसेंबरपासून नव्याने आंदोलन छेडण्यात येईल, असे संस्थेने म्हटले आहे.
जेएनपीटी तसेच उरणमधील दोन खासगी बंदरे व त्यावर आधारित उद्योगांतील जड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी तसेच अनेक अपघात घडत आहेत. या अपघातग्रस्तांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे सुसज्ज रुग्णालयही उरणमध्ये नाही. या पाश्र्वभूमीवर संस्थेने हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत जेएनपीटी प्रशासन भवनात जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत सिडकोच्या दक्षता विभागाच्या अधिकारी प्रज्ञा सरवदे, नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त अरविंद साळवे, रस्ते विकास महामंडळ तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच उरणचे आमदार मनोहर भोईर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष भूषण पाटील, संतोष पवार, उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील, किरीट पाटील आदींनी या समस्यांवर चर्चा केली. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा आढावा २० नोव्हेंबपर्यंत घेण्यात यावा, असे आवाहन जेएनपीटीच्या अध्यक्षांनी केले. वाहतूक कोंडी न होण्यासाठी वाहनतळासाठी जेएनपीटीकडून २२ हेक्टर जमिनीवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसेच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य घेऊन जेएनपीटी रुग्णालयात अपघातग्रस्तांवर उपचार करण्याच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले.

सिडकोची बॅरिकेड्स
नागरी वस्ती तसेच शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात होणारी जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिडको एकूण अकरा ठिकाणी बॅरिकेड्स लावणार आहे. त्याचा एक अहवालच या बैठकीत सिडकोकडून सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे वाहतूक विभाग, सिडको व संस्थेचे पदाधिकारी या परिसरातील रस्त्यांची पाहणी करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल याचा आढावा घेणार आहेत.