नवी मुंबई पालिका इमारतीसमोरील रस्त्याचा दुभाजक तोडून वाहनप्रवेश
नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीसमोर किल्ला जंक्शन चौकात सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बेकायदा पद्धतीने रस्त्याचा दुभाजक तोडण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
किल्ला जंक्शन येथे उरण फाटा ते जेएनपीटी मार्गावर कंटेनरची सर्वाधिक वाहतूक होते. याशिवाय पालिका मुख्यालयाकडे वाहनांची संख्याही अधिक असते. मुख्यालयात येणाऱ्या वाहनांसाठी पाम बीच मार्गे मुख्यालय वा उरण फाटा ते मुख्यालय असा सर्वाधिक वापरला जातो. उरण फाटय़ावरून पालिका मुख्यालयात जाण्यासाठी किल्ला जंक्शन येथील सिग्नलवरून पूर्ण वळण घेत मुख्यालयाच्या दिशेने जावे लागते. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सिग्नलसाठी खूप वेळ थांबावे लागते. तसेच उड्डाणपुलाला समांतर असलेल्या रस्त्यावर पूर्वी दुभाजक बांधण्यात आला होता. हा दुभाजक तोडण्यात आला आहे. त्यामुळे उरण फाटय़ाहून आल्यावर मनापा मुख्यालय सेवा रस्त्याला जाण्यासाठीची किमान दहा मिनिटे वाचतात, मात्र हा दुभाजक हटवून केलेल्या मार्गामुळे अपघातग्रस्त क्षेत्र बनले आहे. जेएनपीटीकडून येणारी वाहने आणि दुभाजाक काढून टाकलेल्या ठिकाणाहून वळण घेताना छोटी वाहने समोरासमोर येतात. त्यामुळे अपघातांची शक्यता असते. याबाबत येथे काम करणाऱ्या पर्यवेक्षकास विचारले असता, ती आमची हद्द नसून आम्हाला सोयीचे व्हावे आणि अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी दुभाजक टाकले आहेत, मात्र काही लोकांनी दुभाजकातील काही भाग हटवल्याने उरण फाटय़ाकडून येणारी वाहने मुख्यालयाकडे जात असल्याची माहिती त्याने दिली.
या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून सलग दुभाजक टाकण्यात आले होते. मात्र ते काढून गाडय़ा हाकल्या जात असतील तर धोकादायक आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. -सुनील लोखंडे, वाहतूक उपायुक्त