खेळांसाठी जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई करावे गावाजवळ सेक्टर-३० येथे असलेल्या गणपतशेठ तांडेल मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून मैदानावरील २२ हजार चौरस मीटर जागा खेळांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मैदानाच्या विकासासाठी ९५ लाख ७५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. या विषयी ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

‘सिडको’कडून महापालिकेला हा भूखंड हस्तांतरित करण्यात आला. विविध प्रदर्शने, खेळ, उद्यान आदी सयुक्तिक वापरासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित होते. मात्र मैदानावर सातत्याने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमुळे खेळासाठी या मैदानाचा वापर करता येत नव्हता. या भूखंडावरील ७५ टक्के जागा मैदानासाठी राखीव ठेवण्याची मागणी माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी प्रस्तावाद्वारे केली होती.

भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ ४६ हजार ७०२ चौरस मीटर असून हा भूखंड महापालिकेकडे ११ मे २००७ रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. भूखंडाचा किती भाग खेळाचे मैदान, प्रदर्शन आणि उद्यानासाठी राखीव ठेवायचा ते निश्चित करण्यात आले नव्हते. ‘सिडको’ने या ठिकाणी ‘हेलिपोर्ट’चा फलकही लावला होता. रेखा म्हात्रे आणि नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला. अखेर हेलिपोर्टची जागा हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. १९ ऑक्टोबर २०१० रोजी भूखंडातील पंच्याहत्तर टक्के जागा खेळासाठी राखीव ठेवण्याची मागणी रेखा म्हात्रे यांनी केली होती. तर २०१५ मध्ये मैदानाच्या उपयोगाविषयाचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र तरीही महापालिकेने मैदान विकसित केले नसल्याने मैदानावर राजकीय सभा, लग्नसोहळे, मेळावे असे कार्यक्रम होत होते. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळत नव्हते.

खेळासाठी मैदान असावे, यासाठी सुरू झालेल्या लढय़ाला ‘लोकसत्ता’ने पहिल्यापासून साथ दिली. करावे गाव नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव आहे. गावातील तरुणांना खेळण्यासाठी मैदान नव्हते. मैदान वापराच्या निश्चितीनंतर पालिकेने मैदान विकसित करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आता स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने लवकरच मैदान विकसित होईल, अशी अपेक्षा स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी व्यक्त केली तर मैदानासाठी पंच्याहत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यामुळे खेळांसाठी हक्काची जागा मिळणार असल्याचे करावे फोर्टी प्लस क्रिकेट संघाचे अध्यक्ष निशिकांत तांडेल यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc to transform tandel grounds
First published on: 13-07-2018 at 02:20 IST