खासगी संस्थेतर्फे आराखडा; गवळी देव धबधबा, बेलापूर तलाव विकसित करणार

* गवळी देव डोंगर भाडेपटय़ाने घेऊन विकसित केला जाणार आहे.

* गवळी देव डोंगर भाडेपटय़ाने घेत पुण्यातील पर्वतीसारख्या पायऱ्या बनविण्याच्या प्रयत्नात आहे.

विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई</strong>

लक्षवेधी इतिहास नसलेले पण उत्तम भविष्यकाळ असलेल्या नवी मुंबईत पर्यटकांना आकर्षित केले जातील अशी पर्यटन स्थळे उभारण्याच्या दृष्टीने पालिका पर्यटन व्हिजन राबविणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम खासगी संस्थेला दिले जाणार असून त्यासाठी वेगळी तरतूद केली जाणार आहे.

वन विभागाच्या ताब्यात असलेला गवळी देव हा पावसाळी धबधबा विकसित करण्याच्या योजनेचा यात समावेश आहे.

नवी मुंबई हे एक सिमेंटचे जंगल असलेले शहर असल्याची भावना इतर शहरांत आहे. सिडकोने या शहराचा विकास करताना ४६ टक्के जमीन मोकळी राहील याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या छोटय़ा शहरांपेक्षा या शहरात सर्वाधिक (२००) उद्याने आहेत. तरीही वृक्षसंपदेत हे शहर कमी पडले असल्याने पर्यावरणात पिछाडीवर आहे. सिडको व पालिकेने निर्माण केलेल्या काही कृत्रिम स्थळांव्यतिरिक्त नवी मुंबईत पाहण्यासारखे असे काही नाही. वीस वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या रेल्वे स्थानकांवर काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याने या स्थानकांचे कौतुक केले जात होते. नवी मुंबई पालिकेने अलीकडे नेरुळ येथे उभारलेले वंडर पार्क हे बच्चे कंपनींचे एक आवडते ठिकाण झाले आहे तर सेल्फी पॉइंट म्हणून पालिकेचे मुख्यालय सध्या चर्चेत आहे. याशिवाय नवी मुंबईत आबालवृद्धांना फिरण्यासाठी दुसरे ठिकाण नाही. त्यामुळे पालिकेने आता र्पयटनस्थळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात नेरुळ येथील विज्ञान केंद्र आर्कषणाचा बिंदू ठरणार आहे. बंगळूरु व पुण्याच्या धर्तीवर हे एका संकल्पेला वाहिलेल्या विज्ञान केंद्राचे काम विधानसभा निवडणुकीअगोदर करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय पर्यटन स्थळे म्हणून वन विभागाच्या ताब्यात असलेला गवळी देव डोंगर भाडेपटय़ाने घेऊन विकसित केला जाणार आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी आपला आमदार निधीदेखील या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी दिला आहे. पालिका या ठिकाणी पुण्यातील पर्वतीसारख्या पायऱ्या बनविण्याच्या प्रयत्नात आहे. या ठिकाणी जुन्या नोसिल कंपनीने लावलेली वृक्षसंपदा मोठय़ा प्रमाणात आहे. त्यात भर घालण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे.

बेलापूर किल्ल्याच्या पुनर्विकासाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. यासाठी सिडको १८ कोटी रुपये खर्च करीत आहे. या ठिकाणी पर्यटकांना फिरण्यासाठी खास व्यवस्था केली जाणार असून उपाहारगृह बांधली जाणार आहेत.  याच ठिकाणी असलेला एक बेलापूर तलावही विकसित केला जाणार आहे. याच परिसराच्या दक्षिण बाजूस खाडीत दोन बेटे आढळून आली आहेत. पालिकेने तयार केलेल्या विकास आराखडय़ात ही बेटे दिसून आल्याने पालिकेने त्याचा विकास करण्याचे ठरविले आहे. यातील एक बेट हे पाण्यात असल्याने दुसऱ्या बेटावर बटरफ्लाय उद्यान उभारण्याचा प्रस्ताव आहे. पामबीच वर असलेला ज्वेल ऑफ नवी मुंबईजवळील धारण तलावही विकसित केला जाणार आहे. पारसिक हिलवर एक संकल्पना उद्यान उभारले जाणार आहे. पर्यटक आकर्षित होतील अशी नैर्सगिक व कृत्रिम स्थळे निर्माण करण्याचे काम येत्या काळात या व्हिजन पर्यटनर्अतगत केले जाणार आहे.

राज्यात नवी मुंबईची ओळख एक आखीव रेखीव शहर अशी आहे. ही ओळख निर्माण होताना र्पयटकांना आर्कषण वाटेल अशा ठिकाणांची निर्मिती करणे राहून गेले आहे. त्यासाठी येत्या काळात पर्यटनाची वेगळ्या जागा तयार करण्याचे काम पालिका करणार आहे. त्यासाठी एका निष्णांत संस्थेला आराखडा तयार करण्याचे काम दिले जाणार आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका