घणसोलीत परिवहनच्या चालकाला मारहाण झाल्यामुळे प्रश्न ऐरणीवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉर्न वाजवला म्हणून रिक्षाचालकांनी एनएमएमटीची बस अडवून बसचालकाला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घणसोली येथे घडली. रिक्षाचालकांनी संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. मारहाण करणाऱ्यांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अशाच पद्धतीने मारहाण करणाऱ्या १० जणांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एनएमएमटीच्या चालकांना मुजोर रिक्षाचालकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बस घणसोली येथील डी-मार्ट जवळून धावतात. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सेक्टर पाच येथे बससमोर रिक्षा उभी होती. त्यामुळे बसचालकाने हॉर्न वाजवला असता त्यावर रिक्षाचालकाने शिवीगाळ करत बसचालक फैय्याज पठाण याला बेदम मारहाण केली. त्याला रस्त्यावर ढकलून दिले. तिथे असलेली सायकल पठाण याच्या डोक्यात टाकली. टॅक्सीचालक देखील त्याला सामील झाले. मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या वाहकाला देखील मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक रखडली. काही स्थानिक तरुणांनी मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही रिक्षाचालकाने बसचालकाला १५-२० मिनटे लाथाबुक्क्य़ांनी मारहाण केली. सायंकाळी उशिरा बसचालकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

यापूर्वीही असा प्रकार घडला होता. रिक्षाचालकांच्या टोळक्याने अशाच पद्धतीने बसचालकांना 

मारहाण केली होती. त्यानंतर या परिसरात वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याबाबत तक्रार केल्यास हे रिक्षाचालक मारहाण करतात. त्यामुळे परिसरात रिक्षाचालकांची दहशत निर्माण झाली आहे. बस सेवेमुळे रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने रिक्षाचालक थेट बसचालकांवर हल्लेकरत आहेत. विनापरवाना रिक्षा थांबे, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा रिक्षा चालकांवर नसणारा अंकुश, वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि शेअर रिक्षाच्या नावावर रिक्षा चालकांना मिळणारा पैसा यामुळे नवी मुंबईतील रिक्षा चालकांची मनमानी वाढली आहे, त्यामुळे रिक्षा चालकांना लगाम घालणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिघ्यापासून सीबीडी बेलापूपर्यंतच्या पट्टय़ात रोज ३० हजारांहून अधिक रिक्षा धावतात. ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसर आणि ऐरोली ते सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा थांबे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. या रिक्षा चालकांना भाडे आकारणीचे वेळापत्रक दिलेले नाही. शिवाय प्रवासी  नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवा, खासगी बसेस, एसटीपेक्षा एक ते दोन रुपये जास्त देऊन प्रवासी शेअर रिक्षांचा मार्ग अवलंबतात. ४० टक्के रिक्षा स्थानिकांच्या ,  तर ६० टक्के रिक्षा बाहेरच्या आहेत.

राजकीय नेत्यांच्या कृपाशीर्वादामुळे  रिक्षा चालक पोलिसांना घाबरत नाहीत. अनेक चालक कागदपत्रे नसतानासुद्धा अंतर्गत भागात जातात. त्यामुळे वाहतूक शाखेच्या नियमानुसार रिक्षा चालक, खासगी वाहन चालक यांची समिती स्थापन करणे अनिवार्य आहे.


एनएमएमटीचा चालक हा नियोजित थांब्यावरून प्रवासी घेतो. मात्र अनेकदा रिक्षा चालक जादा भाडे मिळवण्यासाठी बसथांब्यावर उभे असतात. वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांमध्ये नियमावलीविषयी जनजागृती करायला हवी. एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यात येईल. 
– शिरीष आरदवाड, एनएमएमटी व्यवस्थापक


नियमांचे उल्लंघन केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल. अनधिकृत रिक्षा थांब्यांवर कारवाई करण्यात येईल.
– नितीन पवार, पोलीस उपायुक्त नवी मुंबई वाहतूक

एनएमएमटीचे बस चालक आणि या परिसरातील रिक्षा चालक यांच्याकरिता स्वतंत्र नियमावली आहे, मात्र हे नियम पाळले जात नसल्यामुळे वाद उफाळतात. घणसोलीत झालेल्या प्रकारानंतर रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यास मदत होईल. अनधिकृत रिक्षा चालकांना सीएनजी पेट्रोल पंपवर सीएनजी भरू देऊ  नये. अशा रिक्षांना सेवा देणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. – संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmt bus driver assaulted by auto rickshaw drivers
First published on: 13-06-2017 at 03:33 IST