पनवेल नगर परिषदेची प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर २४ तासांत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा पनवेलमध्ये सुरू करू, हे एनएमएमटी प्रशासनाचे आश्वासन फोल ठरले आहे. पनवेल नगर परिषदेची परवानगी मिळाल्यानंतर २४ दिवस उलटूनही ही बससेवा सुरू होऊ शकली नाही. एनएमएमटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सेवेसाठी घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये तीन मार्गावर ही सेवा चालविण्यासाठी एनएमएमटी सज्ज झाली आहे. नवीन वीस मिनी बस एनएमएमटीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये लवकरच या गाडय़ा धावू लागतील, अशी अपेक्षा होती. गांधीजयंतीपासून ही सेवा सुरू करावी, अशी मागणी येथील सिटीझन्स युनिटी फोरमने एनएमएमटीकडे केली होती. मात्र पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य हाती घेतले जात नसल्याची परंपरा पाळण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने ठरवल्याचे समजते. याशिवाय, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि परिवहन विभागाचे उपायुक्त पट्टीवार हे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्यानेही ही सेवा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
पनवेल रेल्वेस्थानकापासून गार्डन हॉटेल, एचओसी कॉलनीमार्गे साईनगर अशी पहिली मार्गिका यासाठी निश्चित करण्यात आली आहे. ही बससेवा सुरू करण्यासाठी एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी पुढाकार घेतला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी या सेवेला ना हरकत पत्र दिले. या सेवेमुळे पनवेलमधील प्रवाशांना किमान सात व कमाल तेरा रुपयांमध्ये पनवेल स्थानक गाठता येईल. याच अंतरासाठी रिक्षाचालक किमान ३० रुपये वसूल करतात. मीटर न टाकणाऱ्या रिक्षाचालकांच्या मनमानीला यामुळे चाप बसणार आहे.