३० बस मिळताच शहरात सेवा सुरू
नवी मुंबई : केंद्राच्या ‘फेम १’ योजनेअंतर्गत ६० टक्के अनुदानावरील पहिली विद्युत बस नवी मुंबई परिवहनच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पुढील काही दिवसांतच इतर २९ बस येणार असून लवकरच नवी मुंबईत ‘पर्यावरणपूरक बस सेवा’ सुरू करण्यात येणार आहे. पुढील १० ते १५ दिवसांत उर्वरित बस येणार असल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने ‘फेम १’ योजनेअंतर्गत विद्युत बस खरेदीसाठी प्रोत्साहन दिले होते. यासाठी ६० टक्के अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई परिवहन उपक्रमात ३० बस घेण्याचे ठरविण्यात आले होते. विरोधकांनी बहुमत नसताना हा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.
बस खरेदी व चार्जिग केंद्राचे सुमारे ४३ कोटींचे काम ‘जेबीएम’ या कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्यानुसार या बस फरिदाबाद येथून येत आहेत. विद्युत बससाठी प्रथम तुर्भे येथे दोन चार्जिग केंद्र तयार करण्यात आली असून भविष्यात कोपरखैरणे, वाशी, ऐरोली व सीबीडी येथे करण्याचे प्रयोजन आहे. चार्जिगसाठी दीड ते तीन तास लागतात.
याबाबत परिवहनचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले की, तत्काळ ‘आरटीओ’ची कामे पूर्ण करण्यात येतील व आयुक्तांच्या निर्देशानुसार लवकरच या बस नवी मुंबईत धावतील.
इंधनाचा खर्च वाचणार
सध्या नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम तोटय़ात आहे. १ किलोमीटर बस चालविण्यासाठी ३० रुपये खर्च येत आहे. विद्युत बसला १६ रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे निम्मा खर्च वाचणार आहे. परिवहन उपक्रमाकडे सध्या ४८५ बस असून यात ३० बसची भर पडणार आहे. विद्युत बस एकदा चार्जिग केल्यानंतर अंदाजे १५० किलोमीटर चालण्याचा दावा करण्यात आला आहे.
विद्युत बस सुरू झाल्यानंतर परिवहनचा तोटा कमी करण्यासाठी उपयोग होईल. इंधनावर होणारा खर्च वाचणार आहे. त्यामुळे या बस लवकर सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका