बेस्टच्या वातानुकूलित बस बंद केल्याचा फायदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पालिकेच्या डबघाईस जाणाऱ्या परिवहन उपक्रमाची गाडी हळुहळू रुळांवर येऊ लागली आहे. बेस्ट उपक्रमाच्या नवी मुंबईत येणाऱ्या वातानुकूलित बस बंद केलेल्या एनएमएमटीच्या उत्पन्नात प्रतिदिन चक्क दीड लाख रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील मार्गावर वातानुकूलित बसची संख्या वाढविण्याचा एनएमएमटीचा विचार आहे. नजीकच्या काळात मुंबईबाहेर जाणाऱ्या बसगाडय़ांच्या तिकिटात थोडी वाढ करून उपक्रमाचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार  आहे, मात्र त्याच वेळी शहरांर्तगत वाहतुकीच्या तिकिटात कपात करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

वाशी रेल्वे स्थानक ते महापे मिलिनियम बिझनेस पार्क ही ‘हायब्रीड एसी बस’ बंद करण्यात आली आहे. हीच बस आता नेरुळ ते अंधेरी या मार्गावर चालवण्यात येत आहे. नवी मुंबई पालिकेच्या उपक्रमाला काही महिन्यांपासून तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढत जात असल्याने उपक्रमाला काही उपाययोजना कराव्या लागल्या आहेत. त्यात अनेक कामगारांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या उपक्रमात काही नवीन उपाययोजना सुरू केल्या होत्या. त्यामुळे उपक्रम हळुहळू तोटय़ातून सावरत आहे.

बेस्टच्या एसी बसगाडय़ांची नवी मुंबईतील सेवा बंद करण्यात आल्यामुळे मुंबईत बोरिवली, दादर, वांद्रे, अंधेरी, नरिमन पॉइंट या आठ मार्गावर चालवण्यात येणाऱ्या एनएमएमटी बस गाडय़ांतील प्रवासी संख्या वाढू लागली आहे. सोमवारी एनएमएमटीचा नफा एक लाख ६५ हजारापर्यंत वाढला. त्यामुळे मुंबईत आणखी वातानुकूलित बस गाडय़ा सुरू करण्याचा परिवहन उपक्रमामार्फत केला जात आहे. याच वेळी नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानक ते महापे दरम्यान चालविण्यात येणारी हायब्रीड एसी बस सेवा बंद करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.

हीच बस सध्या नेरुळ ते अंधेरी या मार्गावर चालविली जात आहे. काही महिन्यापूर्वी उपक्रमात बजबजपुरी माजल्याचे चित्र होते. त्यामुळे उपक्रमाला महिन्याला तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता.

हा तोटा कमी व्हावा यासाठी मुंबई बाहेर जाणाऱ्या बसवर अतिरिक्त तिकीटभार लावण्याचा विचार उपक्रम करीत आहे, मात्र त्याचवेळी शहरात कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भरुदड सोसावा लागणार नाही, याची काळजीही उपक्रमाकडून घेतली जाणार आहे.

एनएमएमटीची ऐरोली ते मंत्रालय बससेवा

नवी मुंबई परिवहन विभागाच्या वतीने मंगळवारपासून ऐरोली ते मंत्रालय बससेवा सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११९ क्रमांकाची बस ऐरोली ते मंत्रालय या मार्गावर धावेल, अशी माहिती उपक्रमाच्या नियोजन विभाग प्रमुखांनी दिली.

बेस्टच्या वातानुकूलित बसची सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एनएमएमटीच्या बसची प्रवासीसंख्या वाढली आहे. त्यामुळे आठ मार्गाव्यतिरिक्त आणखीही काही मार्ग सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. उपक्रमाला सध्या मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मुंबईबाहेरील प्रवासाच्या तिकिटाची दरवाढ करावी लागणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही वाढ सरसकट केली जाणार नाही. शहरातील प्रवासातील हा तिकीट भार कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nnmt income hike due to best discontinue ac bus services
First published on: 19-04-2017 at 03:15 IST