आरोग्य अधिकाऱ्यांची माजी सभापतींकडून कानउघाडणी
तुभ्रे येथील माता बाल रुग्णालय वर्षभरापासून बंद असून महापालिकेच्या अधिकाऱ्याने पर्यायी जागेचा शोध न घेतल्याने अनेक गरोदर महिलांना ८ ते १० किलोमीटर प्रवास करून इतर रुग्णालय गाठावे लागते. या संतापजनक प्रकाराबाबत स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते. स्थायी समितीच्या बैठकीत रुग्णालयाच्या भाडेवाढ मंजुरीकरिता प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
नवी मुंबईतील सर्वाधिक झोपडपट्टीचा प्रभाग म्हणून तुभ्रे परिसराला ओळखले जाते. या परिसरातील गणेश नगर, इंदिरा नगर, तुभ्रे स्टोअर, कॉरी परिसर इतर नागरिकांकरिता प्राथमिक स्वरूपातील आरोग्य केंद्र व माता बाल रुग्णालय बांधण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे रुग्णालय बंद पडल्याने येथील नागरिकांना वाशी, नेरुळ, कापरखरणे येथील पालिका रुग्णालयात ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयाचा आधारही घ्यावा लागत आहे. तुभ्रे परिसरात भाडय़ाने जागा घेऊन माता बाल रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव १४ महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला वर्ष उलटूनही कोणत्याही प्रकारची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. पालिकेचे वैद्यकीय डॉ. दीपक परोपकारी यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याने सभागृहात खडाजंगी झाली. प्रशासनाला एखादे रुग्णालय सुरू करण्यासाठी जागा मिळत नसेल तर नागरिकांच्या आरोग्याविषयी प्रशासन किती निष्काळजी आहे, ही बाब सुरेश कुलकर्णी व विद्यमान स्थायी समितीचे सभापती नेत्रा शिर्के यांनी आयुक्तांच्या निर्दशनास आणली. डॉ. परोपकारी यांनी महापे येथील रुग्णालयात भाडेवाढ करण्यासंदर्भात विषय मंजुरीसाठी आला असल्याचे सांगत तुर्भे येथील नागरिकांकरिता प्राथमिक व माता बाल रुग्णालय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया येत्या ८ दिवसांत पूर्ण करणार असल्याचे सांगितले.