प्रवाशांची नाराजी; नवीन गाडय़ांसाठी सिडकोकडून ४०० कोटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई नव्याने सुरू झालेल्या नेरुळ-खारकोपर रेल्वेमार्गावर प्रवाशांनी पसंती दिल्याने आणखी २० फेऱ्या वाढविण्याचा रेल्वेचा विचार आहे. मात्र या मार्गावर रेल्वेकडून जुन्या लोकल धावत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सिडकोने १२ डब्यांच्या ११ नवीन गाडय़ा घेण्यासाठी सुमारे ४०० कोटी दिले आहेत.

या मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर या रेल्वेस्थानकातून महिनाभरातच जवळजवळ ३,७९,९३० प्रवाशांनी प्रवास केला होता. दोन महिन्यांत प्रवाशांची संख्या वाढत आहे. उलवे विकसित होत असल्याने मार्गावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे.

या मार्गावर जुन्या गाडय़ा धावत असल्याने नवीन रेल्वेगाडी देण्याची मागणी करण्यात प्रवाशांकडून होत आहे. नवी मुंबईतील या नेरुळ-उरण मार्गाचा प्रकल्प १९९७ साली हाती घेण्यात आला होता. २० वर्ष प्रकल्प रखडल्यानंतर या मार्गावरील प्रकल्पाचा खर्च १७८२ कोटीवर पोहचला आहे. सिडको व रेल्वेच्या भागीदारीतील हा प्रकल्प या मार्गावर नवीन १२ डब्यांच्या ११ रेल्वेगाडय़ांसाठी रेल्वेला सिडकोने ४०० कोटी रुपये दिले आहेत. परंतु जुन्याच रेल्वेगाडय़ा चालवल्या जात आहेत. त्याचबरोबर सीएसएमटी-पनवेल मार्गावरही बहुतांश जुन्याच गाडय़ा चालवल्या जात आहेत.

याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही. तर रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी यांनी संबंधित विभागाकडून अधिक माहिती घेतली जाईल असे सांगितले.

नेरुळ-उरण प्रकल्पामध्ये सिडकोने नवीन रेल्वेगाडय़ांसाठी जवळजवळ ४०० कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरही नवी मुंबईकरांना नवीन गाडय़ा देण्याची आवश्यकता असून रेल्वेने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

-एस.के.चौटालिया, मुख्य सिडको रेल्वे प्रकल्प अभियंता

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old local on nerul kharkopar rail route
First published on: 16-01-2019 at 03:48 IST