उरण : खोपटे खाडी पूल व खोपटे कोप्रोली मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर कायमच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तर आता अपघाताचाही संख्या वाढल्याने येथून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्याच्या कामाला निविदा जाहीर होऊनही कामाला सुरुवात झाली नसल्याने येथील प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
उरण तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांना जोडणाऱ्या खोपटे पुलाच्या दोन्ही मार्गिका खड्डेमय झाले आहेत. उरणच्या दोन विभागांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या खोपटे पुलावर ये-जा करण्यासाठी दोन मार्गिका आहेत. या पुलावरील डांबरी थर उखडल्याने खड्डे झाले आहेत. यात जुन्या पुलावरील स्लॅबमधील लोखंडी सळया मोकळ्या झाल्या आहेत. त्या वाहनांचा टायर अडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या या पुलाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. अवजड वाहनाबरोबरच प्रवासी वाहनेही मोठया प्रमाणात प्रवास करीत आहेत. या प्रवासी वाहनांना ही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खोपटे पूल आणि मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार
खोपटे खाडी पुलावरील खड्डे दुरुस्तीसाठी आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा मंजूर झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असून या पुलाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.
१९९५ चा जुना पूल
खोपटे खाडीपूल हा एक ऐतिहासिक आहे. अनेक वर्षे रखडल्यानंतर उद्घाटनाविनाच १९९५ ला हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लोड बेअरिंग ने जोडलेल्या या पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे तो वारंवार नादुरुस्त होऊ लागला आहे. खोपटे कोप्रोली मार्गाच्या दुरुस्तीची व काँक्रीटीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून ती कंत्राटदाराला देण्यात आली असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र सध्या पावसाळा सुरुवात झाली असून हे काम पुढील चार महिने होणार का असा सवाल आता येथील नागरिकांकडून केला जात आहे.