नवी मुंबई : वाशीतील वाढत्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून महात्मा फुले सभागृह ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत तीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरु असतानाच नवी मुंबई पालिकेने या मार्गावर अरेंजा कॉर्नर ते कोपरी गावापर्यंत तारेचे कुंपण घालण्याचा प्रस्ताव तयार करण्यास घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या विक्रेत्यांची तसेच वापरलेली वाहने विक्री करणाऱ्या दुकानदारांची दुकाने असून या विक्रेत्यामुळे वाहतूक कोंडी होत असून पालिकेने बांधलेल्या सिमेंट क्राँक्रीट रस्त्यातील अर्धा भाग हे विक्रेते व्यापून टाकत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

माजी पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी या मार्गावर भिंत घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो त्यांच्या बदली नंतर हवेत विरुन गेला होता. वाशीतील सेक्टर १७ ते सेक्टर १२ दरम्यानचा रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा आहे. या मार्गात आशिया खंडातील सर्वात मोठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठ (एपीएमसी) असल्याने या मार्गावरुन या बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांचा प्रवास होत आहे.

या मार्गाच्या पश्चिम बाजूस असलेल्या लोकवसाहतीमधून या मार्गावर येण्या-जाण्याचा रस्ता सिडकोने ठेवलेला नव्हता. लोकवसाहतीमधून या मार्गावर र्अतगत वाहने येऊ नयेत हा यामागील उद्देश होता. मात्र पालिकेने या वसाहत व रस्त्याच्या दरम्यान असलेल्या सांडपाणी नाल्यावर पूल बांधून रस्ता तयार केलेला आहे. त्यामुळे या मार्गावर शहरातील सर्वाधिक वाहने आढळून येतात.

उड्डाणपुलामुळे वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्यांना वाव

  • पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करुना पुनर्बाधणी करण्यात आलेल्या सिमेंट कॉँक्रीटीकरणाचा अर्धा भाग मोकळा न करता कोटय़वधी खर्चाची बेगमी करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येत असल्याने सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
  • नवी मुंबई विमानतळ आणि वाढती वाहन संख्या पाहता या मार्गावर केवळ एकाच उड्डाणपुलाची आवश्यकता नाही. या मार्गावर सहा उड्डाणपूल बांधावे लागणार आहेत. पालिकेने या मार्गावर उभारण्यास घेतलेल्या उड्डाणपुलामुळे वाहनांचे सुटे भाग विकणारे विक्रेते वापरलेली वाहने विकणारे दुकानदार यांचा प्रश्न सुटणार आहे. त्यांना हे व्यवसाय करण्यास वाव आणि मुभा मिळणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल बांधण्यापूर्वी किमान विस्तार करण्यात आलेली येथील दोन मार्गिकांना मोकळा श्वाास घेण्याची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नवी मुंबईकरांनी केली आहे. त्यामुळे या मार्गावर दोन किलोमीटर लांबीचा व कमीत कमी सात फूट उंचीचे तारेचे कुंपण घालण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.
  • वाहतूक पोलिसांच्या कृपेमुळे या मार्गावर दोन मार्गिका व्यापून टाकणारी वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक या रस्ते अतिक्रमणावर कारवाई करत नाही. स्थानिक प्रभाग अधिकारी देखील या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आघाडीवर असल्याने हे रस्ते व्यापले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यावर हा तारेचे कुंपण हा पर्याय आहे पण तो अमलात आणला जातो का याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

अर्धा रस्ता काबीज

या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाणिज्यिक दुकाने आहेत. यातील वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानांनी अर्धा रस्ता काबीज केल्याचे चित्र आहे. वाहनांच्या सजावटीसाठी या दुकानांच्या समोर रांगा लागलेल्या असतात. या दुकानदारांच्या दादागिरीचे अनेक किस्से असून पालिकेच्या रस्त्यावर दोन मार्गिका अडवून ही दुकानदारी केली जात आहे. त्याचबरोबर वापरलेली वाहने विकणारे विक्रेत्यांनी या मार्गावरील एक मार्गिका कोपरी ते पेट्रोल पंपापर्यंत अडवून ठेवलेली आहे. या ठिकाणी लोखंडी कुंपण आहे. मात्र ते पालिका व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी खुले ठेवेले आहेत. त्यामुळे या अर्ध कुंपणाचा काहीही उपयोग होत नाही. नसल्याचे दिसून येत असून केवळ कंत्राटदाराचे चांगभलं करण्यासाठी हे अर्धे कुंपण घालण्यात आले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orange corner star fence proposal fencing tender process flyover underway ysh
First published on: 22-03-2022 at 00:22 IST