पंचवटी सहकारी गृहनिर्माण सोसायटी, घणसोली
प्रत्येक गृहनिर्माण संकुलाचे नियम असतात. याशिवाय संकुलात जे सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात, तेथील रहिवाशांपुरतेच ते मर्यादित असतात; मात्र घणसोलीतील पंचवटी सहकारी गृहनिर्माण संस्था याला अपवाद आहे. या संकुलातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात सोसायटीतील सदस्यांव्यतिरिक्त बाहेरील नागरिकांनाही प्रत्येक सण सोहळ्यात सामावून घेतले जाते. इथे तसा दुजाभाव केला जात नाही. परकेपणाची सावलीही अद्याप या संकुलात पडलेली नाही. ‘अतिथी देवो भव’ हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. घणसोलीतील प्रख्यात गृहनिर्माण संस्थांपैकी एक संस्था म्हणून ‘पंचवटी’चा मान आहे. सण साजरे करताना संस्थेच्या बाहेरील नागरिकांना या संकुलात आवर्जून निमंत्रण दिले जाते. सामाजिक उपक्रमात संकुलातील सदस्यांबरोबर बाहेरील व्यक्तीही या सोहळ्यांमध्ये तितक्याच आनंदाने सहभागी होतात. संस्थेत १६८ सदनिका आणि ३३ व्यावसायिक गाळे आहेत. गाळ्यांमध्ये बहुतांश खासगी शिकवणीचे वर्ग भरतात.
संकुलाचे स्वत:चे म्हणून काही नियम आहेतच, पण सरकारी नियमांचेही संस्थेच्या सभासदाकडून तंतोतंत पालन केले जाते. सहकार नियमांनुसारच दोन महिलांना संस्थेच्या समितीत पदाधिकारी म्हणून स्थान देण्यात आले आहे. गणेशोत्सवात अनेक सामाजिक उपक्रम आयोजन केले जाते. या वेळी लहान मुलांना प्राचीन संस्कृतीची माहिती व्हावी, इतिहास जाणून घेता यावा, पुरातन वस्तू पाहता याव्यात या उद्देशाने एक प्रदर्शनही संस्थेच्या वतीने भरवले जाते. यात शिवकालीन इतिहास आणि त्या वेळी वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे, ढालींचे प्रकार, तलवार, दांडपट्टा, रणगाडे आणि तोफांच्या प्रतिकृती प्रदर्शनात ठेवल्या जातात. त्यासमोर त्यांची माहिती लिहिलेली असते. ती मुलांना वाचून दाखवली जाते. यातून येणाऱ्या पिढय़ांना या साऱ्या इतिहासकालीन वस्तूंची माहिती करून दिली जाते. इतिहासाची जाण आणि भविष्याचा वेध घेता यावा, यासाठी हा उपक्रम राबवला जातो.
संकुलात विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. यात आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर यांचा समावेश असतो. मोफत आरोग्य तपासणी झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी संस्थांनी ६० टक्के सवलत देऊन उपचार करावा, अशी सूचना केली जाते. मागणीनुसार काहींच्या वर कमी दरात उपचार केले जातात. शिबिराचे संपूर्ण नियोजन २० ते २५ वयोगटातील तरुण करतात. तरुण पिढी अशा उपक्रमातून सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी पुढाकार घेते. यातूनच त्यांना प्रोत्साहन मिळते. संकुल सुरक्षा व्यवस्था चोख आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने येथील संपूर्ण संस्थेतील महिला आणि लहान मुले आणि सुरक्षारक्षकांना संभाव्य आगीच्या घटनांमध्ये स्वत:चा बचाव कसा करावा, याचे धडे देण्यात आले होते.
इमारतीत अग्निशमन यंत्रणा
संस्थेमध्ये रहिवाशांच्या गरजेनुसार पार्किंग व्यवस्था अस्तित्वात आणण्याचा कमिटीचा मानस आहे. यासाठी हायड्रॉलिक आणि मोटार ऑपरेटिंग पार्किंग प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यात अनेक गाडय़ा योग्य ठिकाणी पार्क केल्या जातील अशी व्यवस्था तयार केली जाणार आहे. संकुलातील परिसर सुटसुटीत राहील, याच्यावर भर दिला जाणार आहे. संकुलात प्राथमिक स्वरूपातील अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात आग लागल्यानंतर सिंचन पद्धतीने ती आटोक्यात आणणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
पूनम धनावडे