पनवेल – पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असला तरी, अजूनही अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे शास्ती माफीची मुदत आणखी ३० दिवसांनी वाढवावी, अशी मागणी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आतापर्यंत ७० हजार करदात्यांनी अभय योजना जाहीर झाल्यापासून २१० कोटी रुपये एका महिन्यात पनवेल महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.
आ. ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात, शासनाच्या तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनंतर महापालिकेने पहिल्या महिन्यात शास्तीवरील रकमेत ९० टक्के माफीचा माफीचा निर्णय घेतला, ज्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, या निर्णयानंतर काहींकडून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तरीही अनेक नागरिक वेळेत कर भरू शकले नाहीत. मुदत वाढविल्यास उर्वरित करदातेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि महापालिकेच्या महसूल वसुलीत वाढ होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
सुट्टी काळात नागरिकांना कर भरता यावा म्हणून पालिकेने गोपाळकाला वगळता अन्य सुट्टीच्या दिवशी पालिकेची प्रभाग कार्यालये कर रक्कम स्विकारण्यासाठी कर्मचा-यांची नेमणूक पालिकेने केली आहे. परंतू एकत्रित नऊ वर्षांचे थकीत कराची रक्कम भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रकमेची तजवीज करण्यासाठी अजून कालावधी मिळाल्यास या योजनेचे लाभार्थी अजून ५० हजार नागरिक होऊ शकतील यामुळे शास्तीच्या रकमेवर ९० टक्यांची सवलतीला अजून महिनाभर मुदतवाढ द्यावी अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली आहे. अभय योजनेच्या मुदतवाढीबद्दल पनवेल महापालिका आयुक्तांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.