शेकापसह रासपचाही चिन्हावर दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल पालिकेसाठीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना शेतकरी कामगार पक्षाचे कपबशी हे निवडणूक चिन्ह त्यांच्या पदरात पडणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष व शेकापने कपबशी या एकाच चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर ठेवला असून, त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करून ऐन निवडणूक काळात हे चिन्ह शेकापकडून हिसकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे.

पनवेल पालिकेची निवडणूक २४ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत रासपने ७८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून, कपबशी याच चिन्हाची मागणी केली आहे. हे चिन्ह कोणाला द्यावे याविषयी पनवेल पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केल्याचे सूत्रांकडून समजते.

शेकापने याच निवडणूक चिन्हावर यापूर्वी पनवेल नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. चार विविध निवडणुकाही याच चिन्हावर शेकापने लढविल्या आहेत, असे शेकापचे नेते  विवेक पाटील यांनी सांगितले. शेकापकडून कपबशी हे चिन्ह काढून घेणे नियमबाह्य़ होईल, असे ते म्हणाले.  हे चिन्ह भाजपच्या मित्रपक्षाला देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणूक आयोगावर दबाव आणण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. याबाबत पालिका आयुक्त निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, कामात व्यग्र असल्याचे सांगून त्यांनी यावर बोलणे टाळले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation cup and saucer
First published on: 30-04-2017 at 01:33 IST