महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला बंडाने ग्रासले असल्याने त्यांच्या विरोधाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांना विषय समित्यांचे गाजर दाखवले जात आहे. सदस्य बनण्यासाठी नेमकी पात्रता काय असावी, याचा अंदाज नसल्याने साहेबांनी व शेठने सांगितले आहे, तर आपल्याला विषय समिती मिळणार याच आशेवर बंडोबांनी आपापल्या परजलेल्या तलवारी म्यान केल्या आहेत. ज्या पक्षांचे १६ सदस्य असतील, त्यांना १ स्वीकृत सदस्य नेमण्याची संधी मिळणार आहे. सभागृहात एकूण चार स्वीकृत नगरसेवक असतील. याव्यतिरिक्त विशेष समित्या आणि परिवहन समित्यांसाठीही विविध निकष लावले जाणार आहेत.
पनवेल महापालिकेच्या पहिल्या सभागृहात आपले स्थान निश्चित करण्यासाठी आसुसलेल्यांचे प्रमाण मोठे होते. त्याला पहिली चाळणी लावण्यासाठी नेत्यांनी ‘५० लाख दाखवा आणि उमेदवारी मिळवा’ ही अट कार्यकर्त्यांसमोर ठेवली. मात्र त्यानंतरही काही जण मागे हटले नाहीत. त्यामुळे पक्षनेतृत्वाने जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याला संधी देण्याचे ठरवले. त्यामुळे इतर पक्षांतून उमेदवार आयात करण्याची वेळ काही राजकीय पक्षांवर आली. बंडखोरी शक्य तेवढी लांबणीवर पडावी म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नावे गुप्त ठेवली. तरीही इच्छुकांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. अशांचे बंड शमवण्यासाठी त्यांना विषय समित्यांचे गाजर दाखविण्यात येत आहे. काही निष्ठावंत व खास कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यांचे आश्वासन निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच व पालिकेत सत्ता येण्यापूर्वीच देण्यात आले आहे.
परिवहन समितीचे आश्वासन दिल्यामुळे अनेक बंडोबांचे बंड थंडावल्याचे कळते. या समितीचे नेमके काम काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पनवेल महापालिकेचे स्वतंत्र परिवहन धोरण नाही, स्वत:च्या मालकीची बससेवा नाही. पनवेल व नैना या क्षेत्रात एमएमआरडीए प्राधिकरण स्वतंत्र परिवहन धोरण राबविणार असल्याने पालिकेची परिवहन समिती काय कामाची असा प्रश्न आहे.
परिवहन समिती
परिवहन उपक्रम स्थापन केल्यास नियमाच्या तरतुदीनुसार १३ सदस्यांची नेमणूक करता येऊ शकेल. पहिल्या सभेत महापालिकेच्या मते ज्यांना प्रशासन व परिवहनाचा अनुभव असेल व अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय व कामगारविषयक ज्यांची क्षमता दिसून आली असेल अशा १२ व्यक्तींची नेमणूक केली पाहिजे.
विशेष समित्या
महानगरपालिकेस पालिका सदस्यांमधून विशेष समित्यांची नेमणूक करता येईल. सार्वजनिक बांधकाम समिती, नियोजन व विकास समिती, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती, माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती, गलिच्छ वस्ती निमूर्लन समिती, क्रीडा समाजकल्याण व सांस्कृतिक कार्यक्रम समिती अशा विविध विशेष समित्या आहेत.