पनवेल : मालमत्ता कर भरत नसल्याच्या मुद्द्यावरून करदाते आणि प्रशासनाचा एकीकडे सातत्याने वाद सुरू असताना गुरुवारी पनवेल महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात तब्बल १७ कोटी ८७ लाख रुपयांचा विक्रमी कर जमा झाला. एका दिवसात कर स्वरूपात जमा होणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाचा कर भरण्यासाठी महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पनवेल महापालिका प्रशासनाने अभय योजना जाहीर केल्यावर करदात्यांनी १८ जुलै ते ३१ जुलै या दरम्यान गेल्या १४ दिवसांत ३७ हजार पेक्षा जास्त करदात्यांनी तब्बल ९५ कोटी रुपयांचा कर जमा केला. तसेच चालू वर्षाचा कर ऑनलाइन पद्धतीने आणि एकरकमी ३१ जुलैपर्यंत भरल्यास ७ टक्के सवलत महापालिकेने जाहीर केली होती. या सवलतीला शुक्रवारी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खारघरमध्ये एकूण ९३ हजार करदात्यांपैकी ११,०७४ करदात्यांनी २३ कोटी ८५ लाख रुपये कर भरला. कामोठे उपनगरातील ८,११३ करदात्यांनी १५ कोटी ७१ लाख रुपये, नवीन पनवेल येथील ६,६१७ करदात्यांनी १० कोटी ३२ लाख, कळंबोलीतील ५,४१४ करदात्यांनी ११ कोटी ८२ लाख रुपये कर भरला. सर्वात कमी कर तळोजातून आला. तळोजात उद्योजकांपैकी २०६ करदात्यांचे ७ कोटी ४२ लाख रुपये कराची रक्कम पालिकेकडे जमा झाल्याची माहिती कर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली.

४ ऑगस्टच्या सुनावणीकडे लक्ष

तळोजातील दीपक फर्टीलायझर ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, लिंडे इंडिया लिमिटेड, जॉन्सन मॅथ्यू केमिकल इंडिया प्रा. लिमिटेड, कुल सोल्यूशन इंडिया प्रा. लिमिटेड आणि तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएमए) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये याचिकाकर्त्यांकडून मालमत्ता कराची थकीत करवसुली थांबवावी यासाठी नवीन कोणतेही आदेश न्यायालयाने दिले नसल्याने कारखानदारांना दिलासा मिळू शकलेला नाही. उलट न्यायालयाने त्यांच्या निरीक्षणात मालमत्ता कराचे देयक देणे व करासंदर्भात कार्यवाही करणे हे पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांचे कर्तव्य असल्याचे नोंदवले. या याचिकेवर ४ ऑगस्टरोजी पुन्हा सूनावणी होणार आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातून साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा कर थकीत असल्याने न्यायालयात महापालिका आणि उद्योजक असा वाद सुरू आहे.

सर्वाधिक करदाते खारघरचे

गेल्या अनेक वर्षांचा थकीत मालमत्ता कर आणि शास्तीचे १० टक्के तसेच चालू आर्थिक वर्षांचा कर आगाऊ भरल्याने पालिकेच्या तिजोरीत भरभराट होत आहे. गेल्या १४ दिवसात कर भरणाऱ्यांमध्ये सर्वाधिक करदाते हे खारघरचे आहेत. तसेच कमी भरणाऱ्यांची संख्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांची आहे.