पनवेल – पनवेल महापालिकेच्या तिजोरीत २१ दिवसात तब्बल १३९ कोटी रुपये मालमत्ता कर स्वरूपात जमा झाले आहेत. आजपर्यंतची ही विक्रमी करवसुली आहे. अभय योजनेच्या काळात तब्बल ५१,८६४ जणांनी या योजनेचा लाभ घेतला.  

पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुढाकार घेऊन १८ जुलै रोजी मालमत्ता करावरील ९० टक्के शास्ती माफीची अभय योजना जाहीर केल्यानंतर त्यास निवासी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ७ ऑगस्टला दुपारपर्यंत ५ कोटी ३० लाख रुपये कर स्वरूपात पालिकेकडे जमा झाले. 

मालमत्ता करावरील शास्तीवर ९० टक्के सवलत मिळविण्यासाठी अभय योजनेची अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. या योजनेत एकरकमी कर भरण्यासाठी रकमेची तजवीज करण्यासाठी करदात्यांची धावपळ होत असल्याने नऊ वर्षांचा एकत्रित कराची रक्कम मोठी असल्याने ही रक्कम भरण्यासाठी ९० टक्के सवलतीच्या अभय योजनेला अजून मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

पनवेल महापालिका क्षेत्रात ३,६४,१७४ करदाते आहेत. सूमारे २००० कोटी रुपयांचा कर महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये ६२५ कोटी रुपये शास्तीची रक्कम आहे. १८ जुलैपासून आतापर्यंत १३९ कोटी रुपये महापालिकेकडे जमा झाले असले तरी ही रक्कम त्यातूलनेत कमी असल्याचे बोलले जाते. अजूनही तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या कारखानदारांनी आणि खारघरमधील बहुतांश करदात्यांनी मालमत्ता कराचे वर्ष व दर कमी होतील या अपेक्षेने कर भरण्यास असहमती दर्शवित आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी महापालिकेतील प्रशासनातील अधिका-यांची भेट घेऊन मालमत्ता कराबाबत लागू केलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्याला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, चार वर्षांचा कर माफ करावा अशा मागण्या घेऊन आंदोलनाचे नियोजन केल्याने महापालिकेच्या करवसुलीत अजून अडचणी येणार आहेत. 

मालमत्ता कर जास्तीत जास्त भरण्यासाठी इच्छुक आहेत. आजही तळोजा औद्योगिक वसाहतीमधील टीआयए या उद्योजकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा उद्योजकांसोबत झाली. या बैठकीत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने विविध याचिकांबद्दल दिलेल्या निर्देशाबद्दलही माहिती उद्योजकांना दिली. अभय योजना महापालिकेने जाहीर केल्यापासून सूमारे ५२ हजार करदात्यांनी त्यांचा कर भरला आहे.- स्वरुप खारगे, उपायुक्त, पनवेल महापालिका