पारसिक हिल

वनराईने आच्छादलेल्या डोंगरावर भटकायला जायचे, तर शहरवासीयांना रजाच काढावी लागते. पण नवी मुंबईतील काही रहिवासी हा अनुभव रोज घेतात. कारण त्यांना लाभले आहे पारसिक हिलचे वरदान. वनराईने आच्छदलेल्या या डोंगरावर परिसरातील रहिवासी नित्यनेमाने फेरफटका मारण्यासाठी येतात. शहराच्या गजबजाटापासून दूर मोकळ्या हवेत फिरताना त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण झाले आहेत. मित्रांचे हे गट टेकडीच्या जतनात हातभार लावत आहेत.

पारसिक हिलच्या शांततेत पहाटे पाचपासूनच पायरव सुरू होतो. बेलापूर, सीवूड, नेरुळ परिसरांतील आरोग्याविषयी, निसर्गरक्षणाविषयी आग्रही असणारे रहिवासी पहाटेच पारसिक हिल गाठतात. नेरुळ येथील अपोलो रुग्णालयापासून व बेलापूर गावाच्या बाजूने अशा दोन्ही दिशांनी पारसिक हिलवर येण्यासाठी मार्गिका आहे. हिलवरील वळणाच्या रस्त्यावरून चालताना सुखद अनुभव मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने गुलाबी थंडी इथे जास्त चांगली अनुभवता येते. उंचावर असल्यामुळे कर्कश-घुसमटलेल्या शहराशी संपर्क तुटतो आणि शांतता व मोकळ्या हवेशी काही काळापुरते नाते जोडता येते.

आजूबाजूच्या परिसरात राहणारे सरकारी अधिकारी व कर्मचारी इथे मॉर्निग वॉकसाठी येतात. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे मागील १३ वर्षांपासून पारसिक हिलवर वॉकसाठी येत आहे. त्यांच्या मित्रांचा ग्रुप तयार झाला आहे. त्याचे नाव त्यांनी ‘ग्रीन बिग्रेड’ असे ठेवले आहे. या ‘ग्रीन ब्रिग्रेड’च्या माध्यमातून पारसिक हिलवरील हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक स्थिती इत्यादींचा विचार करून प्रदूषण नियंत्रण, शहर सुशोभीकरण व जलसंवर्धनाच्या हेतूने सावली व फळे-फुले देणाऱ्या आंबा, चिंच, आवळा, कवठ, वड, पिंपळ, बांबू, बोर, चाफा, बेल या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षारोपणासाठी आणि त्या झाडांची काळजी घेण्यासाठी मासिक ५०० रुपये वर्गणी काढून एका मुलाला ठेवले आहे. ग्रीन बिग्रेडचा ग्रुप हा रविवारीदेखील पारसिक हिलवर येतो. सुनील चव्हाण सांगतात की, ‘‘स्वत: लावलेल्या बेलाच्या झाडांची पाने घरच्या शंकराच्या मूर्तीला वाहण्यासाठी घेऊन जाताना वेगळेच समाधान मिळते. मी आयएस अधिकारी झालो ते केवळ निसर्गामुळेच. माझे पदव्युत्तर शिक्षण कृषी विषयात झाले आहे. झाडांचा पालापाचोळा हा झाडांच्या भोवती खड्डा करून त्यात टाकला जातो. त्यांनतर त्या झाडांना पाणी टाकले जाते. त्यामुळे खत तयार होते आणि मुळांपाशी असणारे पाणीदेखील जास्त दिवस टिकून राहते. वाळलेले गवत डोंगरावरील खडकांवर जाळतो. ‘ग्रीन बिग्रेड’चा सोशल एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून त्यातून रोज मॉर्निग वॉकला येताना भेटण्याच्या ठिकाणापासून अन्य कामांची रूपरेषाही ठरवली जाते.

पारसिक हिलवर ‘नेरुळ सीबीडी बेलापूर वॉकर्स असोसिएशन’चा ग्रुप आहे. या ग्रुपमधील ज्येष्ठ नागरिक महिन्यातून एकदा भेटून त्या महिन्यात ज्यांचे वाढदिवस झाले असतील, ते साजरे करतात. पारसिक हिलवर ज्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येतो. जिथे हे वाढदिवस साजरे केले जातात, त्या ठिकाणाला बर्थडे पॉइंट असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी गेल्या वर्षांपासून स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिनदेखील साजरा करण्यात येतो.

पारसिक हिलवर कृष्ण मंदिर आहे. डोंगरावर महापौर निवासाजवळ पालिकेने उद्यान साकारले आहे. येथे देखील मॉर्निग वॉकसाठी व योगासने करण्यासाठी नागरिक येतात. एमबीआर उद्यानही आहे. येथे मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते आणि ते शहराला पुरवले जाते. या उद्यानातून सीबीडी, बेलापूर, नेरूळचे विहंगम दृश्य दिसते. या उद्यानात सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येतो. मॉर्निग वॉकला अनेकजण सायकलवरून येतात. नेरुळ, बेलापूर, सीवुड्सवरून येणारे पारसिक हिलच्या पायथ्याशी सायकल पार्क करतात. काही जण सायकलिंगच्या सरावासाठी येतात.

पारसिक हिलवर प्रेमीयुगले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गटदेखील येतात. तिथे तलावदेखील आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजूबाजूला झाडेझुडपे वाढली असून पाणी दरुगधीयुक्त झाले आहे.

कडुनिंब, कारले, तुळस, आवळयाचा रस

पारसिक हिलच्या पायथ्याशी कडुलिंब आवळा, कारले, तुळस, आले, दुधी बीट, कोकम, आवळा इत्यादींचा रस घेऊन कष्णा सुंभे येतात. रसाचा एक ग्लास ७ रुपयांना मिळतो. गेली ७ वष्रे ते हा व्यवसाय करत आहेत. उन्हाळ्यात या रसांना जास्त मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पारसिक हिलवर येण्यासाठी बस 
पारसिक हिलवर येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेअंतर्गत बसची सेवा ठेवण्यात आली आहे. ३८ नंबरची बस ही सीबीडी व नेरुळ स्थानकावरून सुटते. अपोलो रुग्णालयाजवळ थांबा असून तिथून पारसिक हिलवर येता येते.

काही महाविद्यालयीन विद्यार्थी पारसिक हिलवर अश्लील चाळे करतात, त्यामुळे वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी पोलिसांनी पेट्रोलिंग करून प्रमीयुगलांना आवर घालावा.

– सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ नागरिक

पारसिक हिल ही निसर्गाने दिलेले देणगी आहे. पण तिची जोपासना होत नाही. येथे सामजिक संघटना वृक्षारोपण करतात. पण महानगरपालिकेने देखील सहकार्य करावे. आजूबाजूला झाडे-झुडपे असल्याने शुद्ध हवा मिळते.

– ऋषीपाल देस्वाल, भारतीय नैसेना अधिकारी