ऐन गणेशोत्सवात कामोठे, कळंबोलीतील प्रवाशांचे हाल

कामोठे व कळंबोली वसाहतींमधील प्रवाशांचे अपुऱ्या परिवहन व रिक्षा सेवेमुळे गणेशोत्सवाच्या काळात हाल होत आहेत. रात्री परिवहन सेवेतील बस गाडय़ा एक तास उशिराने धावत असल्याने तसेच रिक्षाही उपलब्ध नसल्याने प्रवाशांना काळोखात डासांचा त्रास सहन करीत उभे राहावे लागत आहे. प्रवाशांचे असे हाल होण्यामागे नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम (एनएमएमटी)चा आणि जुई, कामोठे गावांतील रिक्षाचालकांचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

कामोठे व कळंबोली वसाहतींमधील नागरिकांना मानसरोवर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करता यावा म्हणून दोन वर्षांपूर्वी एनएमएमटी प्रशासन, पोलीस व प्रवासी संघटना यांनी एकत्र येऊन मानसरोवर रेल्वे स्थानक ते रोडपाली पोलीस मुख्यालय या पल्ल्यावर ५६ क्रमांकाची बससेवा सुरू केली. ही बससेवा बंद पडावी यासाठी मानसरोवर रेल्वे स्थानकासमोर व्यवसाय करणाऱ्या स्थानिक रिक्षाचालकांनी कुटुंबीयांना घेऊन रास्ता रोको केला. रिक्षाचालकांना स्थानिक नेत्यांचा पाठिंबा असल्याने प्रशासनाने रिक्षाचालकांच्या संघटनेसोबत करार केला. यानुसार ५६ क्रमांकाची बससेवा ११ मिनिटांनी एकदा धावेल, तसेच रेल्वे स्थानकापासून काही अंतर दूर या बस उभ्या राहतील, तसेच वसाहतीमध्ये ज्या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड आहेत तेथून किमान ५० मीटर अंतर दूरवर एनएमएमटीचे बसचे थांबे असतील अशा अटी होत्या. यानंतर कामोठेमध्येही एनएमएमटी बस सुरू झाली, मात्र तीनआसनी रिक्षांचा व्यवसाय काही बंद झाला नाही. उलट आजही वसाहतीमध्ये तीनऐवजी पाच प्रवाशांची अवैध वाहतूक रिक्षातून सुरू आहे. त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. या सर्व बाबींचा फटका गणेशोत्सवात प्रवाशांना सहन करावा लागला.

जुई-कामोठे गावामध्ये रिक्षाचालकांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना होत असल्याने रिक्षाचालक स्थानकात सायंकाळी नसतात. याची माहिती एनएमएमटी प्रशासनाला असूनही प्रशासनाने येथे गाडय़ांची संख्या वाढविली नाही. किमान गणेशोत्सवामध्ये एनएमएमटी प्रशासनाने अतिरिक्त बससेवा येथे सुरू करणे अपेक्षित होते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. गणपतींचे घरोघरी आगमन झाल्यापासून कळंबोली व कामोठे येथील प्रवाशांना मोठी रांग लावून आपली हक्काची बस कधी येते किंवा रिक्षा कधी येतात, याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्येच येथे डासांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांना डासांचा त्रासही सहन करावा लागत आहे.

प्रवाशांच्या मागण्या

* बससेवा ही स्थानकाच्या जवळ ठेवा.

* कामावर येण्या-जाण्याच्या वेळेत तसेच सणासुदीच्या काळात दोन लोकलमागे एक बससेवा ठेवा.