खारघरमधील पाळणाघरात दहा महिन्यांच्या बालिकेला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असली तरी पाळणाघरातील फक्त दहा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे आरोपी अफसाना शेख हिने आणखी किती मुलांना मारहाण केली आणि तिचे इतर मुलांशी कसे वर्तन होते, हे पडताळून पाहण्यासाठी या दहा दिवसांच्या फुटेजवरच विसंबून रहावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer poPcqTHM]

‘पूर्वा प्ले ग्रुप’मधील मारहाण प्रकरणी आरोपी अफसाना शेख न्यायालयीन कोठडीत असून, प्ले ग्रुपची संचालिका प्रियंका निकमची जामिनावर सुटका झाली आहे. या पाळणाघराचे तीन महिन्यांपासूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी पीडित बालिकेच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, फक्त दहा दिवसांचे फुटेज मिळविण्यात पोलिसांना यश आले. जप्त केलेल्या पाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी दोनच दिवसांचे चित्रीकरण आतापर्यंत उपलब्ध झाले आहे. अजूनही आठ दिवसांचे चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू आहे.

प्रियंका व तिचा पती प्रवीण हे सेक्टर १० येथील एलीट इन्केल्व या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर राहतात. गुरुवारनंतर पूर्वा प्ले ग्रुपमधील अमानुष मारहाणीची दृष्ये समोर आल्यापासून निकम दाम्पत्य हे त्यांच्या घरात नसल्यामुळे त्यांच्या घराच्या दरवाजावर शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी नोटीस चिकटवली आहे.

बालिका गंभीर, पालक चिंतातूर

पीडित बालिकेच्या डोक्याला दुखापत झाली असून, डोक्यातून रक्तस्राव होत आहे. बालिका अजूनही उलटय़ा करत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. सीटीस्कॅन अहवालानंतरच पुढील उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

एकही महिला पोलीस अधिकारी नाही

या प्रकरणात पीडित, आरोपी, तक्रारदार महिलाच आहेत. मात्र चौकशीसाठी अद्याप कोणत्याही महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. सुमारे एक लाख महिलांची संख्या असलेल्या खारघरमधील पोलीस ठाण्यात एकही महिला कार्यरत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

[jwplayer psUg1N0g]

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police has 10 days cctv footage of kharghar daycare incidents
First published on: 27-11-2016 at 04:53 IST