नवी मुंबई : सामान्य नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अपघात टाळावेत यासाठी पोलीस विभाग सतत जनजागृती करतो आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करतो. मात्र, नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने स्वतःच गंभीर बेजबाबदारपणाचे उदाहरण घालून दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
कोपरखैराणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकारी बिपीन तुतूरवाड यांनी आपल्या काही महिन्यांच्या लहान मुलीला कारच्या स्टेअरिंगवर बसवून वाहन चालवले आणि त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर रिल तयार केली. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून, “कायद्याचे पाईकच, जर कायदा पायदळी तुडवत असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे जावे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहन चालवताना क्षणिक निष्काळजीपणाही अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. अशावेळी लहान मुलाला स्टेअरिंगवर बसवणे हा थेट जिवावरचा खेळ आहे. अशा कृतीमुळे अपघाताचा धोका प्रचंड वाढतोच परंतु, यात वाहनात बसलेल्यांसोबत लहान बाळाचे प्राणही धोक्यात येऊ शकतात. त्याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांचीही सुरक्षा धोक्यात येते.
वाहतूक कायद्यानुसार चालकाने वाहन पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याच्या स्थितीत आणणे हे केवळ निष्काळजीपणा नसून गंभीर कायदेशीर गुन्हा आहे.
कायदेशीर कारवाई काय होऊ शकते?
मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicles Act) अशा प्रकारे वाहन चालवल्यास वाहन जप्ती, परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते.
लहान मुलाचे प्राण धोक्यात घालणे हा प्रकार बालकांच्या सुरक्षेवरील कायद्यांतर्गत (Juvenile Justice Act / IPC च्या संबंधित कलमांनुसार) गुन्हा ठरू शकतो.
सरकारी सेवेत असलेला अधिकारी नियमभंग करताना आढळल्यास त्याच्यावर विभागीय चौकशी व निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
वायर रील पाहून नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, “नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणारे अधिकारीच जेव्हा असे प्रकार करतात, तेव्हा सामान्यांना काय आदर्श मिळणार?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मुलांच्या सुरक्षेवर अशा बेजबाबदार कृत्याने गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या घटनेनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून तुतूरवाड यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस विभागाच्या विश्वासार्हतेवर डाग लागणार नाही यासाठी याबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.