भाजप, शेकापमध्ये चढाओढ
निवडणुका आल्या की राजकीय पक्षांकडून वेगवेगळे प्रचाराचे उपक्रम राबवून पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार केला जात असून २०१७ मध्ये नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी आत्ताच कंबर कसली आहे. उरणमध्ये भाजप व शेकापने पक्षाचे चिन्ह असलेल्या आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी छत्र्या तयार करून त्याचे वाटप सुरू केले आहे. त्यामुळे कार्यकत्यार्ंचा मात्र फायदा झाला आहे.
राजकीय पक्षांसाठी निवडणुका म्हणजे इव्हेंट झाले आहेत. त्यासाठी उमेदवार व राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या विविध क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. राजकीय प्रचारासाठी मॅनेजमेंट करणाऱ्या अनेक कंपन्याही तयार झाल्या आहेत. या कंपन्यांकडून उमेदवार व राजकीय पक्षांचे कंत्राट घेतले जातात. त्यासाठी वॉर रूमही तयार केल्या जातात. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. प्रचारासाठी आणि खास करून आकर्षक प्रचारासाठी उमेदवार लाखो रुपये खर्च करीत आहेत. यामध्ये नेहमीच्या टोप्या, उपरणे, झेंडे, बॅनरचा समावेश असतोच. मात्र सध्या यात बदल झाला आहे. यातील सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा भाग ठरू लागला आहे. २०१४ ची निवडणूक तर त्यासाठीच ओळखली जाणार आहे. तर दुसरीकडे सध्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे छत्री खरेदीही जोमात असताना भाजप व शेकाप या दोन राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी छत्र्यांचे वाटप सुरू केले आहे. या दोन्ही पक्षांचे राजकीय चिन्ह व पक्षाचे नाव या छत्र्यांवर छापण्यात आले आहे. राजकीय पक्षांची ही येत्या २०१७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरच्या प्रचाराचीच सुरुवात असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र कार्यकर्त्यांना व नागरिकांना मात्र मोफत छत्री मिळाल्याने फायदाच होत आहे.