scorecardresearch

उरण शहरात पुन्हा एकदा पोस्ट कार्यालय सुरू; ज्येष्ठ नागरिकांकडून स्वागत 

पोस्ट ऑफिस जेएनपीटी येथे स्थलांतरित झाल्याने वेळ, पैसा, श्रम अधिक खर्ची घालावे लागत होते.

ज्येष्ठ नागरिकांकडून स्वागत 

उरण : उरण शहरातील कोटनाका येथील पोस्ट ऑफिसचे कार्यालय जीर्ण व मोडकळीस येऊन धोकादायक स्थितीत आल्याने हे कार्यालय अनेक महिन्यांपासून उरण शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरित झाले होते. त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे विविध त्रासाला सामोरे जावे लागत होते.

पोस्ट ऑफिस जेएनपीटी येथे स्थलांतरित झाल्याने वेळ, पैसा, श्रम अधिक खर्ची घालावे लागत होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, महिला आदींना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे उरण शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक पोस्ट कार्यालयाच्या प्रतीक्षेत होते.

उरण शहरातच पोस्ट ऑफिस कायमस्वरूपी राहावे अशी नागरिकांची मागणी होती. आता मात्र नागरिकांची ही चिंता मिटली असून उरण शहरातील गिरीराज अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १, २,  बी विंग, तळमजला आनंदनगर, उरण-करंजा रोड येथे हे पोस्ट ऑफिस सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

उरण शहरात पोस्ट ऑफिस सुरू झाल्याने आता नागरिकांच्या वेळ, श्रम, पैशांची बचत होणार आहे. पंचायत समिती, पोलीस ठाणे, नगर परिषद, तहसील कार्यालय, न्यायालय इत्यादी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापने, शाळा-कॉलेजजवळच असल्याने याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांसाह शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.

या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १०.३० वाजता शरण्या यु (डायरेक्टर पोस्टल सव्‍‌र्हिस, नवी मुंबई विभाग) यांच्या हस्ते झाले.

 यावेळी डॉ. अभिजित इचके, सीनिअर सुप्रिडेंट, सुनील पवार, असिस्टंट सुप्रिडेंट, प्रशांत म्हात्रे, पोस्ट मास्टर उरण तसेच पोस्ट ऑफिस उरणचे अधिकारी-कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Post office started once again in uran city akp