पहिल्याच पावसात शीव-पनवेल महामार्गाची चाळण

पावसाळा सुरू होताच शीव-पनवेल महामार्गाची चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सप्टेंबर २०१६मध्ये तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अवघ्या नऊ महिन्यांत हा निधी खड्डय़ांत गेला असून आता सायन-पनवेल टोलवेज लि. पुन्हा तीन कोटींचे खड्डेभरण हाती घेणार आहे. कंपनीचे रस्ता देखभाल विभागाचे अभियंता, संजीत श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सायन-पनवेल टोलवेज यांच्या टोलवाटोलवीत रस्त्याची डागडुजी बराच काळ रखडली होती. सप्टेंबर २०१६मध्ये हे काम हाती घेण्यात आले. त्या वेळी वाशी गाव येथील महामार्ग, जुईनगर, तुर्भे नाका, खारघर हिरानंदानी, कोपरा पूल, कामोठे उड्डाणपूल, उरण फाटा व उड्डाणपूल यांची दुरुस्ती करण्यात आली होती. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते. महामार्गावरील खड्डय़ांसाठी ३ कोटी आणि उरण फाटा व कामोठे उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, मात्र यंदा पहिल्या पावसातच हा सगळा खर्च वाहून गेला आहे.

कामोठे उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे खोल आणि मोठे आहेत. गेल्या वर्षी काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते, ते वाहतुकीच्या ताणामुळे आणि उखडले गेले आहेत. खारघर हिरनानंदानी येथील खड्डय़ांचे काम पावसाळ्यातच करण्यात आले होते. या मालमपट्टीमुळे रस्ता सध्या सुस्थितीत आहे. रस्त्यांची केवळ पावसाळ्यापुरती डागडुजी करण्यात येते.

हमी कागदावरच

सायन-पनवेल टोलवेज लिमिटेडने २०१३ साली बाराशे कोटी रुपये खर्च करून शीव-पनवेल मार्ग बांधला. या महामार्गासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरल्याचा दावा ‘सायन पनवेल टोलवेज’ने केला होता. महामार्गावरील उड्डाण पुलासाठी २५ वर्षांची हमी असणारे मास्टिक डांबर वापरले होते. काँक्रिटीकरण ५ वर्षे टिकेल असा दावा करण्यात आला होता, परंतु अवघ्या ४ वर्षांतच रस्त्यानंच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले आहे. देण्यात येणारी हमी आणि केले जाणारे दावे केवळ कागदावरचराहत आहेत.

खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी

वाशी गाव सिग्नल चौक हा नवी मुंबई, पनवेल परिसरात जाण्यासाठीची मुख्य रस्ता आहे, मात्र येथे पडलेल्या मोठय़ा खडय़ांमुळे वाहने घसरतात, बंद पडतात. वाहतूक कोंडी होऊन वाहतूक अर्धा तास खोळंबते.

आम्ही निधी मिळेल तसे रस्त्यांचे काम करत आहोत. मात्र आता शहरात वाहनांची संख्याही तिपट्ट झाली आहे त्यामुळे रस्ते लवकर खराब होत आहेत.

संजीत श्रीवास्तव, अभियंता, रस्ता देखभाल, सायन पनवेल टोलवेज लिमिटेड