|| शेखर हंप्रस

महावितरण कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे वीज ग्राहक त्रस्त

नवी मुंबई : महावितरणच्या मनमानी कारभाराचा प्रत्यय नेहमीच ग्राहकांना येत असतो. वाशीतील एक ग्राहक दोन महिन्यांचे थकीत देयक भरण्यासाठी रांगेत उभे असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची वीज कापली. काही मिनिटे थांबण्याची विनंती करूनही कर्मचारी थांबले नाहीत.

करोनानंतर आर्थिक परिस्थिती खालावल्याने विजेची देयके भरताना अनेकांना कसरत करावी लागत आहे. मात्र महावितरणकडून याचा विचार न करता एक दोन दयके थकली तरी वीज खंडित केली जात आहे.

वाहनचालक असलेले व वाशीत राहणारे नरेंद्र राठोड यांनाही महावितरणच्या या कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. राठोड हे वाशी सेक्टर ९ येथे राहत असून त्यांना महिन्याचे वीज देयक सरासरी अकराशे ते बाराशेच्या आसपास येते. आर्थिक चणचण असल्याने त्यांना ऑगस्ट महिन्याचे देयक भरता आले नाही. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्ट असे मिळून दोन हजार ४२० देयक आले. हे देयक २३ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान भरणे आवश्यक होते. म्हणून पैशांची जुळवाजुळव करून ते २३ ऑक्टोबर रोजी ते देयक भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गेले. ते रांगेत उभे असतानाच महावितरणचे कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यानी वीज मीटर कापण्याची कारवाई सुरू केली. त्यांच्या पत्नीने त्यांना विनंती केली की माझे पती देयक भरण्यासाठी गेले आहेत. काही मिनिटांत पावती देते, तरीही त्यांची वीज कापली गेली. त्यानंतर राठोड देयके भरून घरी आले तर महावितरण कर्मचारी निघून गेले होते. त्यांच्याशी संपर्क केला असता तुम्हाला दंड आणि जोडणी शुल्क भरावे लागेल असे सांगण्यात आले. त्यातही जर सेक्टर १५ कार्यालयात दंड रक्कम भरली तर २३६ रुपये आणि सेक्टर १७ च्या कार्यालयात भरले तर ३५४ रुपये दंड भरावा लागेल असे सांगण्यात आले. येथेच मनस्ताप थांबला नाही तर दंड भरल्यानंतर  मीटर बसवला तोही दुसराच अशी व्यथा राठोड यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. असे प्रकार अनेकांच्या बाबतीत होत असून आहेत.

असे झाले असेल तर निश्चित चुकीचे आहे. या प्रकरणाची मी स्वत: शहानिशा करतो. यात कर्मचारी दोषी आढळला तर योग्य ती कारवाई केली जाईल. – राजाराम माने, कार्यकारी अभियंता, महावितरण