नवी मुंबई:  मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या सीबीडी येथील कोकण भवन इमारतीत आता अभ्यंगतांच्या गाड्यांना १४ ऑगस्ट पासून  प्रवेश बंद करण्यात आला आहे. हे करीत असताना अभ्यांगतांच्या गाडी पार्किंग कुठे कराव्या ? याचा विचारही करण्यात आला नसल्याचा आरोप केला जात आहे.  त्यामुळे आता पार्किंगची जटिल  समस्या असलेल्या सीडीबी मधील सार्वजनिक ठिकाणी पार्किंगचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत. 

हेही वाचा >>> चंद्रयान महाराष्ट्रात सोडले असते तर रस्त्यावर खर्च होणारे करोडो रुपये वाचले असते; राज यांची उपहासात्मक टीका

सीबीडी येथे कोकण भवनची इमारत दिमाखात उभी आहे. या ठिकाणी सरकारच्या विविध विभागाचे ३५ पेक्षा अधिक कार्यालय असून त्यात नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाचेही कार्यालय आहे. या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयात थेट नागरिकांशी संपर्क येणारीही अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे अभ्यंगताचा राबता या ठिकाणी कायम असतो. त्यांच्या गाड्याही कोकण भवन कार्यालयातच पार्क केल्या जात होतात. मात्र गाड्यांची वाढती संख्या पाहता जागा अपुरी पडू लागणी आहे. त्यामुळे अनेकदा येथील  कर्मचारी अधिकारी यांच्या गाड्या पार्किंगला जागा राहात नाही. मुंबईत वा इतरत्र सरकारी कार्यालयात काम करणारे व सीबीडी येथे राहणारे अनेक अधिकारी कर्मचारी याच कार्यालय परिसरात गाडी पार्क करून लोकलने प्रवास करतात व रात्री घरी जाताना गाडी घेऊन जातात. त्यामुळे  पार्किंग  या समस्येने जास्तच उग्र रूप घेतल्याने अखेर अभ्यंगतांच्या  वाहनांना प्रवेश बंदी आदेश काढण्यात आला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी १४ ऑगस्ट पासून करण्यात आली आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहने असतील त्यांच्या गाड्यांवर स्टिकर्स   चिटकवण्यास दिली जाणार आहेत. जेणेकरून सुरक्षा रक्षकाला बाहेरील गाडी कुठली हे ओळखता येईल. 

हेही वाचा >>> नवी मुंबई : टोल भरा आणि मरा अशी समृद्धी मार्गाची अवस्था-राज ठाकरे

दुसरीकडे लोकशाहीचे प्रतीक असलेल्या कोकण भवन मध्येच लोकांच्या गाडी पार्किंगचा विचार होऊ नये याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यात या ठिकाणी भंगार गाड्या मोठ्या प्रमाणावर असून राडारोडा पडला आहे हे दोन्ही काढले तर २० तरी गाड्यांची जागा होऊ शकते.  कोकण भवन लगत एक मोठा भूखंड असून काही वर्षांपूर्वी कोकण भवन मध्ये येणारे अभ्यंगत त्याच भूखंडावर गाडी पार्क करीत होते. मात्र सध्या त्या ठिकाणी फेरीवाले बसवण्यात आले असल्याने पार्किंग करणे शक्य नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी अनेक वेळा प्रयत्न करूनही कोकण भवन कार्यालय संबंधित अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  सुधीर दाणी (अध्यक्ष सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन इंडिया ) याबाबत आम्ही लेखी तक्रार कोकण कार्यालयास केली आहे. पार्किंग समस्या आहे हे खरे असले तरी अभ्यंगतांना प्रवेश बंदी हा त्यावरील उपाय नाही. शेवटी तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता त्यांच्याच गाड्यांना प्रवेश बंदी हे अयोग्य आहे. त्या ऐवजी उपायोजना आवश्यक असून त्या सुचवल्या गेल्या आहेत.