गर्दी टाळण्यासाठी आठ दिवस आधीच गणेशमूर्तीचे आगमन

नवी मुंबई : करोना निर्बंध असल्याने गर्दी टाळण्यासाठी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून गणरायांना घरी आणले. मात्र गणराय मंडपात आल्यानंतर सार्वजनिक मंडळांनी मात्र वाजत गाजत स्वागत केले. यात ‘डीजे’च्या तालावर तरुणाई थिरकलीच शिवाय मुखपट्टी व सुरक्षा अंतराचा विसर पडल्याचे दिसून आले. घरगुती गणेशमूर्ती मात्र साधेपणाने आणण्यात आल्या. करोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आहेत. साधेपनाने उत्स साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहे.

१० सप्टेंबर रोजी गणपती प्रतिष्ठापणा होणार आहे. मात्र या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांनी अगोदरच मूर्ती घेऊन जाण्याचे आवाहन भक्तांना केले आहे. त्यामुळे शहरातील काही घरगुती व सार्वजनिक मंडळांनी रविवारी गणेशमूर्ती आणल्या. घरगुती मूर्तीचे आगमन साधेपणाने झाले. सार्वजनिक मंडळांनीही गणेशमूर्ती विक्रेत्यांकडून साधेपणाने आणल्या. मात्र आपल्या विभागात आल्यानंतर मात्र आगमन मिरवणुका काढण्यात आल्या. यासाठी ‘डीजे’ही लावण्यात आले होते. त्यामुळे शहरात रविवारी संध्याकाळपासून  दहा वाजेपर्यंत तरुणाई डीजवर थिरकताना दिसत होती. आवाजावर मर्यादा ठेवण्यात आल्या होत्या मात्र करोनाचा विसर पडल्याचे दिसत होते. अनेकांच्या तोंडावर मुखपट्टी तर दिसत नव्हतीच शिवाय सामाजिक अंतराचा फज्जाही उडाला होता. यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचेही दिसत होते. प्रशासन व पोलीस मात्र कुठे दिसले नाही. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले कार्यकर्ते जागोजागी उभे केले होते. कारवाईची शक्यता दिसताच ते सूचना देत मिरवणुका बंद करीत होते.

करोनामुळे गेल्या वर्षीपासून गणेशमूर्ती अगोदरच घरी नेण्यात येत आहे. यावर्षी ही भक्तांनी रविवारपासून गणरायांना घरी नेण्यास सुरुवात केली आहे.

-मयुरेश लोटीलकर, नमस्कार श्रीमूर्ती केंद्र, वाशी