डेंग्यूला आळा घालण्यासाठी उपाययोजना

दिल्लीमध्ये कूलरच्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या आळ्या सापडल्याने संबंधित नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याने नवी मुंबईत डेंग्यू व मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी फिश टँक, रोपांच्या कुंडय़ा, रिकाम्या भांडय़ांत पाण्याची साठवणूक करणाऱ्या रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्याचा पालिका प्रशासन विचार करीत आहे. नवी मुंबईत डेंग्यू, मलेरिया या आजारांनी डोके वर काढले असून शहरातील रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. या विषयावर पालिकेने सोमवारी एका विशेष सभेचे आयोजनही केले होते.
राज्यात नियोजनबद्ध शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईत सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यूमुळे प्लेटलेट कमी झाल्याने तीन रुग्ण दगावल्याची चर्चा आहे. शहरात खासगी व शासकीय अशी दीडशे रुग्णालये असून पालिकेच्या एकमेव मोठय़ा रुग्णालयात ३२५ पेक्षा जास्त रुग्ण साथीच्या आजारांवर उपचार घेत आहेत. ३०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात जमिनीवर बिछाने अंथरून उपचार केले जात आहेत. त्यामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील रुग्णांचा आकडा दीड ते दोन हजारांवर गेला आहे. पालिका प्रशासन या दोन आजारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कोपरखैरणे येथील माथाडी रुग्णालयात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली असून एका कुटुंबातील चार-पाच रुग्ण एका रांगेत एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दृश्य आहे. या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी आरोग्यावर आधारित विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनावर तोंडसुख घेतले, तर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली. ऐरोली व नेरुळ, बेलापूर येथे पालिकेची रुग्णालये बांधून तयार आहेत पण कर्मचारी, डॉक्टर आणि सुविधांमुळे सुरू झालेली नाहीत. वाशी येथील पालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयावर ताण वाढला असून बाह्य़ रुग्ण कक्षात दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण दररोज उपचार घेत आहेत. पालिका साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व उपाययोजना करीत असताना हे आजार नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने उच्चभ्रू लोकवस्तीतील घरांमधून झाडांच्या कुंडय़ा, फिश टँक अशा डेंगीच्या डासांची पैदास करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात विचार होत आहे. सोसायटीच्या छतावरील अडगळीतील सामान, टायर ठेवणाऱ्या रहिवाशांवरही कारवाईची शक्यता आहे.
उच्चभ्रू वस्तीत डेंग्यूचे रुग्ण
नेरुळसारख्या उच्चभ्रू वस्तीत रहिवाशांनी रोपाच्या कुंडय़ांखाली ठेवलेल्या पसरट ताटात पाणी साचल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घरात स्वच्छ पाण्याची साठवणूक करणाऱ्या कुंडय़ा, फिश टँक यांची स्वच्छता न करणाऱ्या, पालिका फवारणी करू न देणाऱ्या रहिवाशांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पालिका प्रशासन विचार करीत आहे. विशेष म्हणजे, डेंग्यूचे रुग्ण झोपडपट्टी भागात तुलनेने कमी आढळत असल्याचे दिसून आले आहे.
– सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई</p>

गुन्हे दाखल करणे शक्य
दिल्ली किंवा मुंबई पालिकेप्रमाणे अनेक वेळा प्रबोधन केल्यानंतरही घरात स्वच्छ पाण्याचे साठे करणाऱ्या रहिवाशांवर सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कलमाखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन गुन्हे दाखल करण्याचे पाऊल उचलू शकते.
– डॉ. संजय पत्तीवार,     अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका