स्थानिकांचा विरोध; न्यायालयात जाण्याचा इशारा
प्रादेशिक परिवहन विभागाच्या नेरुळ येथील उपप्रादेशिक कार्यालयासाठीच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी प्रचंड बंदोबस्तात पार पडला. या कार्यालयाला स्थानिकांचा विरोध असून आता या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बंदोबस्तात परिवहन मंत्री दिवाकर रावते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. नेरुळ येथील ‘रेयान स्कूल’ येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, नवी मुंबई उपप्रादेशिक अधिकारी दशरथ वाघुले आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक आमदार मंदा म्हात्रे तसेच नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी पाठ फिरवली.
दिवाकर रावते यांनी या वेळी सांगितले की, आपण कार्यकाळात परिवहन विभागाला उभारी दिली. महाराष्ट्रातील २० कार्यालयांचा प्रश्न सुटणार असून १० कार्यालयांसाठी जागा मिळाल्या आहेत. दोन कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले असून चार इमारतींचा भूमिपूजन झाले आहे.
शहराचे प्रेक्षणीय स्थळ असलेल्या ‘वंडर्स पार्क’च्या समोरच वाहन तपासणीसाठी भूखंड देण्यात आला आहे. याला येथील नागरिकांचा पहिल्यापासून विरोध आहे. आता नेरुळ सेक्टर १३ येथील भूखंड ८ व ९ वर उपप्रादेशिक कार्यालयाची इमारत होणार आहे. १ हजार २३२ चौरस मीटर दोन वर्षांत ७.१६ कोटी रुपये खर्चून ही पाच मजली इमारत होणार आहे. यालाही स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी कार्यकर्त्यांसह विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अगोदरच नोटीस जारी करीत मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे त्यांनी रावते यांना यासंदर्भात निवेदन दिले. याविरोधात नागरिकांच्या सहकार्याने आम्ही कोर्टात धाव घेणार असल्याचे सांगितले.