पनवेल – शीव पनवेल महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कोपरा गावालगत माती आणि खडी यांच्यासाह्याने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबतची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविषयी समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे.  

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास कऱणा-या सर्वच सरकारी यंत्रणांना गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत म्हणून तातडीने खड्यांमध्ये खडी, वाळु आणि सिमेंटमिश्रीत मटेरीयल टाकण्याएेवजी थेट रस्त्याकडेला साचलेल्या मातीच्या ढिगा-यातून उपसलेली माती टाकून थेट महामार्गातील खड्यांमध्ये टाकली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी शीव पनवेल महामार्गावरून कोपरा पुल ओलांडल्यानंतर कळंबोली दिशेकडे जाताना जागरूक नागरिक प्रशांत रणवरे यांनी खड्डे भरण्याचे काम करताना पाहीले. हे काम पाहण्यासाठी त्यांनी स्वताचे वाहन थांबवल्यावर त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसल्याने त्यांनी तातडीने त्याचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर प्रसारीत केला.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याठिकाणी काम करणारे पर्यवेक्षक सन्नी देवकर यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की, शीव पनवेल महामार्गाच्या भागातील खड्यांवर ही माती टाकलेली नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते त्याठिकाणी वाहतूक पोलीस आले त्यांनी वारंवार रस्त्याकडेला असणा-या खड्यात काही तरी टाकून खड्डे बुजविण्याची विनंती केली. त्या पोलिसांना हा आमच्या कामाचा भाग नसल्याचे सांगीतले. मात्र पोलीस एेकायला तयार नव्हते. त्याच पोलिसांनी जवळची माती टाकून तरी खड्डे बुजवा असे सांगीतल्यामुळे तेथील मजूरांना आमचे काम संपल्यावर तेथील काम करण्यासाठी सांगीतले. मात्र काही क्षणात हा व्हिडीओ काढल्याने ते काम लगेच बंद केले. ज्या रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजवले तो रस्ता पनवेल महापालिकेचा असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ऋषिकेश पिंगळे यांनी सांगीतले.